यंदा आमच्यासोबत ‘दादा’ आम्हीच जिंकणार बारामती; गिरीश महाजन यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 13:26 IST2023-09-27T13:24:29+5:302023-09-27T13:26:18+5:30

बारामतीसह राज्यातील सर्व जागा भाजप जिंकणार असून, मोदीच पंतप्रधान होणार

This year we will win 'Dada' Baramati with us; Faith of Girish Mahajan | यंदा आमच्यासोबत ‘दादा’ आम्हीच जिंकणार बारामती; गिरीश महाजन यांचा विश्वास

यंदा आमच्यासोबत ‘दादा’ आम्हीच जिंकणार बारामती; गिरीश महाजन यांचा विश्वास

बारामती: यंदा आमच्यासोबत अजितदादा पवार व त्यांच्यासोबतचे आमदारही आहेत. त्यामुळे बारामतीची जागा आम्ही जिंकू. मी गेल्या तीस वर्षांपासून आमदार आहे, मी कायम खऱच बोलतो, कदाचित बारामतीकरांचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. पण, बारामतीसह राज्यातील सर्व जागा भाजप जिंकणार असून, मोदीच पंतप्रधान होणार, असा विश्वास ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

चौंडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून, तेथे भेट देण्यासाठी गिरीश महाजन निघाले होते. यावेळी बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.

महाजन पुढे म्हणाले, बारामतीसह सर्व ४८ जागा जिंकणार असून, देशाचे आगामी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच असतील, असा विश्वासदेखील महाजन यांनी व्यक्त केला. त्यांनी मित्र पक्षांसह राज्यात लोकसभेसाठी निर्विवाद यश प्राप्त करू. विरोधक याबाबत क्लिन बोल्ड होतील. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री स्तरावर बैठक झालेली आहे. त्यात सकारात्मक मार्ग निघाला असून, उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. यातून निश्चित सकारात्मक मार्ग निघेल व उपोषण संपेल.

पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून अन्याय होतो. ही ओरड विरोधकांची आहे, राष्ट्रवादी व उध्दव ठाकरे यांच्याकडे कोणी थांबायला तयार नाही, त्यांनी त्यांचे पक्ष नीट सांभाळावेत. पंकजा मुंडे आमच्यासोबतच आहेत, त्यामुळे त्याची काळजी इतरांनी करू नये. मराठा आरक्षणाबाबतही योग्य तोडगा निश्चित निघेल. समिती स्थापन झाली असून, अभ्यास सुरू आहे. चाळीस दिवसांची मुदत याकरिता देण्यात आली आहे. सरकार निश्चित काहीतरी चांगला मार्ग काढेल, असेही महाजन म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शब्दांचा विपर्यास केला गेला. देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत खुलासा केला असल्याने हा विषय फार ताणू नये, असे मत महाजन यांनी व्यक्त केेले.

Web Title: This year we will win 'Dada' Baramati with us; Faith of Girish Mahajan