ही काही पहिलीच वेळ नाही; आरोपी पुन्हा पळाला, छातीत दुखत असल्याने आणले होते ससूनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 17:33 IST2025-03-26T17:32:12+5:302025-03-26T17:33:19+5:30
आरोपी पसार होण्याची ही काही पहिलीच वेळ नसल्याने पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून आरोपीने पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे

ही काही पहिलीच वेळ नाही; आरोपी पुन्हा पळाला, छातीत दुखत असल्याने आणले होते ससूनला
किरण शिंदे
पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातून विनयभंगाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने पळ काढला. बुधवारी (२६ मार्च) सकाळी हा प्रकार घडला. संतोष यशवंत साठे (वय ५१) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. कराड पोलिसांनी त्याला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर उपचारासाठी त्याला मंगळवारी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांनी हातातील बेदी काढून पळ काढला. बंडगर्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका तरुणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात कराड पोलिसांनी संतोष साठे याला २५ मार्च रोजी अटक केली होती. अटक केल्यानंतर छातीत दुखत असल्याने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. दरम्यान आज सकाळी उपचार सुरू असताना आरोपीने हातातील बेडी काढून पळ काढला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दरम्यान ससून रुग्णालयातून आरोपी पसार होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कुख्यात ड्रग्स तस्कर ललित पाटील याच ससून रुग्णालयातून पसार झाला होता. त्यानंतर ससून रुग्णालयातील मोठे रॅकेट उघडकीस आले होते. आवश्यकता नसताना तुरुंगातील कैद्यांना ससून रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली ठेवून घेतले जात असल्याचे निष्पन्न झाले होते. याप्रकरणी पोलिसांसह रुग्णालयातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा ससून रुग्णालयातून आरोपीने पळ काढल्याने एकच खळबळ उडाली आहे.