Thieves stolen Rs 2 lakh 41 thousand in cash at baramati | अंगावर खाज येण्याची पावडर टाकली अन् चोरटयांनी २ लाख ४१ हजारांची रोकड पळविली 

अंगावर खाज येण्याची पावडर टाकली अन् चोरटयांनी २ लाख ४१ हजारांची रोकड पळविली 

बारामती: बारामती शहरातील भिगवण चौकात भर दिवसा अंगावर खाज येण्याची पावडर टाकत २ लाख ४१ हजारांची रक्कम रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्निल विलास पवार (रा. इको व्हिलेज बिल्डींग, कसबा, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पवार येथील महालक्ष्मी अ‍ॅटोमोटीव्ह प्रा. लि. मध्ये काम करतात. शोरुमचे संचालक सचिन सातव यांच्या घरून त्यांनी १ लाख ४१ हजार ८०० रुपयांची रक्कम आणली होती. ती एका बॅगेत भरून ते भिगवण चौकात बारामती सहकारी बँकेत आले. बँकेतून एक लाख रुपये काढून त्यांनी ते बॅगेत ठेवले. ते स्वतःच्या दुचाकीकडे जात असताना तोंडाला पांढरा रुमाल बांधलेल्या एका युवकाने पवार यांना ‘किस का पैसा निचे गिरा है, अशी विचारणा केली. पवार यांनी खाली पाहिले असता तेथे २० व १० रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. ते त्या नोटा घेण्यासाठी खाली वाकले .यावेळी त्यांच्या मानेवर व कॉलरवर काही तरी पडल्याची जाणीव झाली. मानेला खाज सुटल्याने जवळच असणाऱ्या चहाच्या गाड्यावर गेले. तेथे मान धुवत असताना पैशाची बॅग त्यांनी शेजारील स्टुलावर ठेवली होती. त्यानंतर 
शर्ट घालत असताना ही बॅग त्यांना दिसली नाही. त्यांनी बॅग शोधण्याचा प्रयत्नही केला. त्याचवेळी युवकही तेथून पसार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या बॅगेत २ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम, महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट, महालक्ष्मी मुव्हर्स प्रा. लि. चे तीन चेकबुक, पासबुक, एटीएम असे साहित्य असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Thieves stolen Rs 2 lakh 41 thousand in cash at baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.