“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 17:14 IST2024-12-21T17:14:30+5:302024-12-21T17:14:52+5:30
गौतमी म्हणाली, 'शिवाजी महाराजांचं पुस्तक नक्की वाचेन. तसेच फकिरा हे पुस्तक वाचण्यासाठीही प्रोत्साहन मिळालं आहे.'

“मला नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं” पुणे पुस्तक महोत्सवात गौतमी पाटीलची हजेरी
पुणे : नेहमी डान्स फ्लोअरवर थिरकणारी प्रसिद्ध डीजे डान्सर गौतमी पाटील आज एका वेगळ्या भूमिकेत दिसली. पुणे पुस्तक महोत्सवाला हजेरी लावत तिने वाचनाची प्रेरणा घेतली आणि पुस्तक वाचनाची सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गौतमी म्हणाली, “मला इतर ठिकाणी नाचायला बोलावतात, पण इथे पुस्तक वाचायला बोलावलं गेलं आहे, याचं मला खूप अप्रूप वाटतंय. पुण्यात एवढा मोठा पुस्तक महोत्सव भरतो हे मला आज समजलं. आता यापुढे मोकळ्या वेळेत नक्कीच पुस्तक वाचायला सुरुवात करेन.” प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी गौतमीला पुणे पुस्तक महोत्सवाला आमंत्रित करून पुस्तक वाचनासाठी प्रोत्साहित केलं.
याबाबत गौतमी म्हणाली, “प्रवीण दादा सुचवेल तेच पुस्तक वाचणार आहे. शिवाजी महाराजांचं पुस्तक नक्की वाचेन. तसेच फकिरा हे पुस्तक वाचण्यासाठीही प्रोत्साहन मिळालं आहे.”
गौतमीला वाचनाची गोडी लागावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, “फकिरा हे अण्णाभाऊ साठे यांचं अमरकाव्य प्रत्येकाने वाचावं. मी गौतमीला हे पुस्तक भेट देणार आहे. या पुस्तकाने अनेकांना नवी दिशा दिली आहे.”
यावेळी बोलताना गौतमीने आपल्या डान्सच्या प्रवासाला देखील उजाळा दिला. ती म्हणाली, “मी लहानपणापासून डान्स करते. पण पुस्तक वाचनाची संधी आजवर मिळाली नव्हती. मात्र, या महोत्सवाने मला पुस्तक वाचनाची नवी प्रेरणा दिली. आता मी नक्की पुस्तक वाचेन. सर्वांनी पुस्तक वाचायला सुरुवात केली पाहिजे.”यावेळी प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नीने गौतमीला पुस्तक भेट देत वाचनाची नवी सवय अंगीकारण्यासाठी प्रेरणा दिली.
गौतमीच्या या सकारात्मक बदलामुळे पुणे पुस्तक महोत्सवातील हजेरी अधिक खास बनली आहे. पुस्तक महोत्सव हे केवळ वाचनप्रेमींसाठीच नाही तर नवोदित वाचकांना वाचनाची गोडी लावणारं व्यासपीठ ठरल्याचा आनंद पुस्तकप्रेमींनी व्यक्त केला.