धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:38 IST2025-10-11T16:38:08+5:302025-10-11T16:38:40+5:30
धंगेकर आता शिवसेनेत असून त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचा धर्म व युतीची नियमावली, याचे पालन करणे गरजेचे आहे

धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
पुणे : पुण्यात निलेश घायवळ प्रकरणात रोज नवी माहिती समोर येऊ लागली आहे. त्याचे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या घायवळ प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर महायुतीतीलच नेत्यांना लक्ष्य केले आहे. यावरून उपमुखयमंत्री अजित पवारांनी धंगेकरांचा समाचार घेतला. आपण पक्षांतर केले, हे धंगेकर विसरले असल्याचे पवार म्हणाले आहेत.
वडगांव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम झाला. तत्पूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार रविंद्र धंगेकर निलेश घायवळ प्रकरणावरून भाजप नेत्यांवर टीका करत असल्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, रविंद्र धंगेकर हे अजूनही कॉंग्रेसमध्ये आहोत असे समजत आहे. त्यांनी पक्षांतर केले आहे, याचे भान त्यांना नाही. ते विसरले आहेत. ते आता शिवसेनेत आहेत. त्यांचे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनी युतीचा धर्म व युतीची नियमावली, याचे पालन करणे गरजेचे आहे. मित्रपक्षाचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य
स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती असते. यापूर्वी आम्ही या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक नेतेमंडळींना दिले होते. त्याच पद्धतीने यावेळीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वतंत्र असेल. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे नेते म्हणून मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही कायम बेरजेचे राजकारण करतो, त्यामुळे ज्यांची प्रतिमा चांगली आहे. ज्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे दाखल नाहीत, अशांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही ते म्हणाले.
त्यांनी आत्मपरीक्षण करावे
कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते व त्यानुसार मदत करते. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत असतात. सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते. मात्र, सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका अजित पवार यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर केली.