वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 12:24 IST2025-04-29T12:23:38+5:302025-04-29T12:24:14+5:30

राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे

There will be relief from traffic congestion Flyover on Sinhagad Road inaugurated by Ajit Pawar on Maharashtra Day | वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

वाहतूककोंडीतून मुक्तता होणार! सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलास मुहूर्त; महाराष्ट्रदिनी अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन

पुणे: सिंहगड रस्त्यावरील (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल खुला करण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. या एकेरी उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी सकाळी सात वाजता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यामुळे राजाराम पुलाकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची महाराष्ट्रदिनी वाहतूककोंडीतून मुक्तता होणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाइम थिएटर यादरम्यान अडीच किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे काम २१ सप्टेंबर २०२१ मध्ये सुरू करण्यात आले असून ७१ पिलर्स आणि १०६ गर्डर उभारलेले आहेत.

विठ्ठलवाडीकडून स्वारगेटकडे येण्यासाठी राजाराम पूल चौकात उभारलेला उड्डाणपूल यापूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यान एकेरी उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे, तर माणिकबाग ते विठ्ठलवाडी यादरम्यानच्या एकेरी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रॅम्पचे काम सुरू आहे.

विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपूल मार्चअखेर, माणिकबाग ते विठ्ठलवाडी यादरम्यानचा उड्डाणपूल डिसेंबरअखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर यादरम्यानचा उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनासाठी केवळ नेत्यांची वेळ मिळत नसल्याने तो वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. उड्डाणपुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे, यासाठी भाजपची नेतेमंडळी प्रयत्नशील होती. उद्घाटनाचा मुहूर्त ठरल्याचेही भाजपकडून सांगण्यात येत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी, दि. २७ एप्रिल रोजी उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यातच दोन दिवस मुख्यमंत्री शहरात होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे उद्घाटन होईल, अशी आशा होती. मात्र, उद्घाटन झाले नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली.

त्यानंतर तातडीने सूत्रे हलली आणि उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर १ मे रोजी सकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे ठरले. त्यामुळे महाराष्ट्रदिनी राजाराम पूल चौकातून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांची कोंडीतून सुटका होणार आहे.

Web Title: There will be relief from traffic congestion Flyover on Sinhagad Road inaugurated by Ajit Pawar on Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.