Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 19:13 IST2026-02-05T19:10:46+5:302026-02-05T19:13:26+5:30
महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे

Pune Mayor: महापौर निवडीनंतर अजितदादांच्या निधनामुळे पुण्यात भाजपकडून जल्लोष होणार नाही - गणेश बिडकर
पुणे : पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेत भाजपचे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची आहे. तरी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला असल्याची माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.
पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांचाच महापौर व उपमहापौर होणार हे निश्चित आहे. महापौरपदाच्या शर्यतीत अखेर मंजुषा नागपुरे यांचे नाव आघाडीवर आहे. उपमहापौर पदासाठी परशुराम वाडेकर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसही या महापौर आणि उपमहापौरपदाच्या शर्यतीत उतरले आहे. परंतु भाजपचा महापौर आणि उपमहापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. म्हणून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले, "माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत."
सिहंगड रोडला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार
महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थित होणार आहे. निवडणुकीच्या दिवशी पीठासीन अधिकारी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देतात. त्यानंतर अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक प्रक्रिया राबवून सभागृहात मतदान होते. भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे नागपुरे आणि वाडेकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या निवडीच्या घोषणा झाल्यानंतर सिंहगड रोड परिसराला प्रथमच महापौरपदाचा मान मिळणार आहे. नागपुरे या सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत त्यांनी प्रभाग क्रमांक ३४ मधून बिनविरोध विजयी झाल्या आहेत. मंजूषा नागपुरे या भाजपच्या निष्ठावंत नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. महापालिकेच्या कामाच त्यांचा चांगला अनुभव आहे. स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीवर त्यांनी काम केलेले आहे. उपमहापौरपदासाठी भाजपकडून परशुराम वाडेकर यांनी अर्ज भरला आहे.