Shiv Jayanti 2026: पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 11:51 IST2026-02-19T11:50:49+5:302026-02-19T11:51:15+5:30

आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. - ग्रंथागार प्रतिनिधी

There is not a single book on Chhatrapati Shivaji Maharaj in the Pune Government Library. | Shiv Jayanti 2026: पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही

Shiv Jayanti 2026: पुण्याच्या शासकीय ग्रंथागारात छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही

पुणे: पुणे स्टेशन परिसरात असलेले शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार. बंद होण्याची वेळ ५ वाजता. तरीही कदाचित खुले असेल या अपेक्षेने 'लोकमत' प्रतिनिधीने ग्रंथालय गाठले. मात्र, पदरी निराशाच पडली. तरीही दरवाज्याला कुलूप लावले नसल्याने कडी ठोठावून कुणाला तरी बाहेर बोलाविण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकजण बाहेर आला. त्या वेळी ग्रंथागार प्रतिनिधीशी साधलेला हा संवाद.

मी : नमस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके मिळतील का? गुरुवारी (दि. १९) शिवजयंती आहे. त्यामुळे पुस्तकांची खरेदी करायची होती.
ग्रंथागार प्रतिनिधी : पण, आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे एकही पुस्तक नाही. केवळ एकच कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे पुस्तक होते. त्याची प्रतही संपली आहे.
पुण्यातील शासकीय ग्रंथालयातील हे वास्तव समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचे गौरवग्रंथ, जीवनचरित्र किंवा कुठल्याच प्रकारचे साहित्य शासकीय ग्रंथालय येथे उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राज्य सरकारतर्फे तयार करण्यात आलेले साहित्य पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर येथे छपाई होऊन ते विक्रीसाठी उपलब्ध असते. पुण्यातील फोटो झिंको प्रेससह राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जनगणना कार्यालय भाषा संचालनालय, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सामान्य प्रशासन विभाग, विधानमंडळ, तसेच इतर कार्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उपलब्ध नसल्याचा आरोप पुणे जिल्हा ग्रंथालय संघाने केला आहे. राज्य सरकारच्या राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत उपलब्ध करून दिले जाते. शासनाकडे प्र. न. देशपांडे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ आणि कृष्णराव अर्जुन केळुस्करांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ अशी दोन लहान पुस्तके उपलब्ध होती. मात्र, आता या पुस्तकांच्या आवृत्त्याही संपल्या आहेत. त्यामुळे शासकीय ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकेच नसल्याचे पाहायला मिळत आहे. केळुस्कर यांनी लिहिलेले चरित्र खासगी प्रकाशकांनी प्रसिद्ध केल्याने ते उपलब्ध आहे. मात्र, या पुस्तकासह खासगी प्रकाशनांची इतर पुस्तके महाग असल्याने सर्व वाचकांपर्यंत ती पोहोचू शकत नाहीत.

ज्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चरित्र साधने प्रकाशन समिती, महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, याच्या माध्यमातून दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत शासनातर्फे उपलब्ध करून दिले जाते, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन करून छत्रपती शिवाजी महारांजाविषयी दर्जेदार साहित्य नाममात्र किमतीत वाचकांना उपलब्ध करून दिली पाहिजेत, अशी भावना पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर कपोते यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवग्रंथ, जीवनचरित्र किंवा कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांचे १९ खंड ज्याप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयांना राज्य शासनाने मोफत वाटले, त्याचप्रमाणे शासकीय ग्रंथालयांना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची चरित्रे मोफत उपलब्ध करून द्यावीत, तसेच साहित्य अकादमीने प्रसिद्ध केलेले सेतुमाधवराव पगडी लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हे चरित्रही उपलब्ध व्हावे. - चंद्रशेखर कपोते, कार्याध्यक्ष, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ

 

Web Title : शिवाजी जयंती से पहले पुणे के सरकारी पुस्तकालय में शिवाजी महाराज की पुस्तकें नहीं।

Web Summary : शिवाजी जयंती से पहले पुणे के सरकारी पुस्तकालय में शिवाजी महाराज पर कोई किताब नहीं है। केवल एक, जो अब अनुपलब्ध है, मौजूद थी। पुणे जिला पुस्तकालय संघ ने इस अनुपस्थिति की आलोचना की और सरकार द्वारा सस्ती कीमतों पर साहित्य उपलब्ध कराने का अनुरोध किया।

Web Title : No Shivaji Maharaj books at Pune government library before Shivjayanti.

Web Summary : Pune's government library lacks books on Shivaji Maharaj before Shivjayanti. Only one, now unavailable, existed. The Pune District Library Association criticizes the absence and requests government-provided literature at affordable prices.