...तर दादागिरी उखडून काढा!

By Admin | Updated: June 9, 2015 05:37 IST2015-06-09T05:37:20+5:302015-06-09T05:37:20+5:30

चर्चेच्या माध्यमातून प्रश्न तो सोडवा. मार्ग न निघाल्यास कामगार नेत्यांची दादागिरी कायमची उखडून टाका, असा सल्ला पालकमंत्री गिरीष बापट यांनी माथाडी कामगारांना दिला

... then grab the bulkhead! | ...तर दादागिरी उखडून काढा!

...तर दादागिरी उखडून काढा!

पिंपरी : हरामाचे आणि फुकटचे खाऊ नका. आठ तास घाम गाळल्यानंतर त्या कष्टाचा मोबदला मात्र सोडू नका. हक्कांसाठी उठसूट संपाचे शेवटचे हत्यार उचलू नका. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न तो सोडवा. मार्ग न निघाल्यास कामगार नेत्यांची दादागिरी कायमची उखडून टाका, असा सल्ला पालकमंत्री गिरीष बापट यांनी माथाडी कामगारांना दिला.
महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युुनियनतर्फे थेरगाव येथे माथाडी कामगारांचा मेळावा रविवारी झाला. त्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, शिवसेनेच्या महिला आघाडी संघटक सुलभा उबाळे, ज्येष्ठ कामगार नेते माधव रोहम, सांगलीचे गोपीचंद पाडळकर, खेडचे बाबा राक्षे, नगरसेवक नवनाथ जगताप,आतिष शेख, हर्षल ढोरे, युनियनचे कार्याध्यक्ष इरफान सय्यद तसेच, युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. बापट यांच्या हस्ते ‘कामगारांचे हक्क व अधिकार’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच परिसरातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कामाची शिस्त पाळा. कष्टाचा मोबदला न दिल्यास तो मिळविण्यासाठी चर्चा करा, असे सांगून प्रसंगी दादागिरी उखडून टाका, असा सल्ला त्यांनी दिला. कंपनीत ८ तास काम करून नेतेगिरी करावी. दादागिरी न करता कामगारांच्या मनात आदराची भावना तयार करा. भ्रष्टाचारी कामगारांना मोक्का लावण्याची हिंमत आमच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने प्रथम दाखविली असल्याचे बापट यांनी सांगितले. माथाडी कामगारांच्या समस्या मांडून, त्यांना घर देण्याची योजना मंजूर करण्याची मागणी रोहम, उबाळे, पाडळकर यांनी केली. युनियनचे कार्याध्यक्ष सय्यद यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आदराची भावना तयार करा
कामगारांच्या जीवावर कंपनी मोठे होते. कामगारहिताला प्राधान्य दिले पाहिजे. घाम गाळणाऱ्या कामगारांना उद्योजकांनी विसरू नये. त्याचे, तसेच त्याच्या कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, वाहन सुविधा, विमा आदी सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सध्या काही धंदेवाईक कामगार नेते दिसतात. उठसूट संप करीत उद्योगांना टाळे ठोकण्यास प्रवृत्त करतात. कंपनीत ८ तास काम करून नेतेगिरी करावी. दादागिरी न करता कामगारांच्या मनात आदराची भावना तयार करा. - गिरीश बापट, पालकमंत्री

Web Title: ... then grab the bulkhead!