आई वडील लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले असताना युवकाने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 17:21 IST2023-05-22T17:21:12+5:302023-05-22T17:21:48+5:30
साठेवस्ती परिसरात २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना

आई वडील लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले असताना युवकाने उचलले टोकाचे पाऊल
लोणी काळभोर : साठेवस्ती परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गंभीर घटना रविवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली. सुदर्शन ज्ञानेश्वर काळभोर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, युवकाचे आई वडील एका लग्नसमारंभासाठी बाहेरगावी गेले होते. त्यानंतर सुदर्शनने घराची कडी आतून लावून घेतली. घराजवळील दुकानदारांनी काही कामानिमित्त दरवाजा वाजवला असता त्यांना घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तसेच सुदर्शनच्या मोबाईलवर देखील बरेच कॉल करून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी सुदर्शनचे वडीलांना फोन करून याबाबत माहिती दिली. दरम्यान रात्री नऊच्या आसपास सुदर्शनचे आई वडील घरी आल्यानंतर कॉल करून व दरवाजा वाजवून देखील काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी संपर्क केला.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ पोलीस अंमलदार अजिंक्य जोजारे व केतन धेंडे हजर होऊन त्यांनी हातोड्याच्या सहह्याने दरवाजा तोडला असता घरातील एका खोलीत सुदर्शनने गळफास घेतलेले आढळून आले. या घटनेने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.