"तो व्हिडिओ बनावट, लोकेशन लपवण्यासाठी ॲपचा वापर"; भिगवण अपहरण प्रकरणात पडळकरांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:47 IST2026-02-18T17:47:34+5:302026-02-18T17:47:57+5:30
भिगवण अपहरण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

"तो व्हिडिओ बनावट, लोकेशन लपवण्यासाठी ॲपचा वापर"; भिगवण अपहरण प्रकरणात पडळकरांचा आरोप
Bhigwan Crime: पुणे जिल्ह्यातील भिगवण परिसरात मंगळवारी दुपारी एका तरुणीचे फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला होता. मात्र, आता या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळाले आहे. संबंधित तरुणीने स्वतः एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, आपले अपहरण झाले नसल्याचा दावा केला आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा व्हिडीओ जबरदस्तीने तयार करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्वामी चिंचोली येथील २१ वर्षीय तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घराकडे जात होती. यावेळी एका चारचाकी वाहनातून आलेल्या जहीर शेख आणि अयान शेख या दोन तरुणांनी त्यांना अडवले. आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली आणि त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणीला जबरदस्तीने गाडीत बसवून पळवून नेले, अशी तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती.
भिगवण बंद आणि जनक्षोभ
या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक नागरिक आक्रमक झाले. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पुणे-सोलापूर महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली होती.
तरुणीचा व्हिडिओ आणि लव्हस्टोरीचा ट्विस्ट
पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच पीडित तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तरुणीने, "माझे अपहरण झालेले नाही, मी माझ्या मर्जीने जहीरसोबत आले आहे. आमचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत आणि त्याने माझ्यावर कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. माझ्या डोळ्यात चटणी वगैरे टाकलेली नाही. मी माझ्या मर्जीने घरातून निघून आले आहे. राजकीय पुढाऱ्यांनी तसे आरोप केले. परंतु मी माझ्या मर्जीनेच मुलासोबत आलेली आहे माझ्या अपहरणाच्या बातम्या चुकीच्या आहेत," असं म्हटलं.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती
अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक तपासात मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दीड महिन्यात दोघांमध्ये ११ वेळा संपर्क झाला होता. यामध्ये मुलीने ८ वेळा एसएमएस केले होते, तर मुलाने मध्यरात्री कॉल केले होते. हे कॉल्स अवघ्या काही सेकंदांचे असून त्यानंतर व्हॉट्सॲपवर त्यांचे संभाषण सुरू असल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांचा संशय
दरम्यान, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रियाही उमटली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी तरुणीच्या व्हिडिओवर शंका उपस्थित केली आहे. हा व्हिडिओ तरुणीकडून जबरदस्तीने बनवून घेण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
"मुलीचा जबरदस्तीने व्हिडीओ तयार करुन तो पोलीस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवला जात आहे. मी मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली आहे. मुलीला वडील नाहीत. मुलीचे पुढच्या दोन चार दिवसात लग्न होतं. जबरदस्तीने मुलीचे अपहरण केले गेले. मी भिगवन पोलीस ठाण्यात जाणार आहे. सर्व हिंदू समाज संतापलेला आहे. मी व्हिडीओ पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांना फोन केला. त्यांनी सांगितले की हा व्हिडीओ पाठवण्यासाठी वेगळे अॅप वापरले ज्यात लोकेशन दिसत नाही. त्यांनी पोलिसांना घरच्यांना व्हिडीओ पाठवला. म्हणजे या मुलाला वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे कुणीतरी आहे. त्याचे चुलते इथले गुंड आहेत. हिंदू मुलीच्या अपहरणामध्येही तो आरोपी होता," असं गोपीचंद पडळकर म्हणाले.