उत्तम नेतृत्वामुळेच महाराष्ट्रात सहकारी चळवळीला यश - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 18:35 IST2025-09-15T18:35:18+5:302025-09-15T18:35:53+5:30
उत्तम नेतृत्व, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती, विश्वस्त म्हणून काम करण्याचा संस्कार आणि विश्वासाहर्तमुळेच महाराष्ट्रासारख्या राज्याने सहकारी क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे.

उत्तम नेतृत्वामुळेच महाराष्ट्रात सहकारी चळवळीला यश - नितीन गडकरी
पुणे: उत्तर भारतात सहकार चळवळ यशस्वी होऊ शकली नाही. मात्र, महाराष्ट, गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यात सहकारी चळवळ मोठय़ा प्रमाणात वाढली. उत्तम नेतृत्व, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती, विश्वस्त म्हणून काम करण्याचा संस्कार आणि विश्वासाहर्तमुळेच महाराष्ट्रासारख्या राज्याने सहकारी क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. ‘लोकमान्य'सारख्या संस्थांनी हीच चतु:सूत्री घेऊन नवा आदर्श उभा केला असल्याचे कौतुकोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे काढले. सत्तेच विकेंद्रीकरण झाले, तसे संपत्तीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.
‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी'ने 30 वर्षाच्या अविस्मरणीय प्रवासाचा टप्पा पूर्ण केला असून, 31 व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, उपाध्यक्ष अजित गरगट्टी तसेच संचालक प्रसाद ठाकुर, गजानन धामणेकर, पंढरी परब आदी उपस्थित होते. या वेळी ‘लोकमान्य'च्या 30 वर्षाच्या कामगिरीचा आढावा घेणाऱ्या कॉफीटेबल बुकचेही प्रकाशन करण्यात आले. ‘लोकमान्य'चे ठेवीदार, हितचिंतक यांनीही मोठय़ा संख्येने कार्यक्रमाला हजेरी लावली.
गडकरी म्हणाले, की ‘लोकमान्य सोसायटीने 30 वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. ही साधी गोष्ट नाही. आज महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकमधील सहकारी संस्था अतिशय उत्तम काम करत आहेत. उत्तर भारतात मात्र ही चळवळ म्हणावी तितकी यशस्वी झालेली नाही. उत्तर भारत, दिल्ली, हरियाणा किंवा आजूबाजूच्या राज्यांमध्ये सहकार कधी वाढला नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात ही चळवळ इतकी का यशस्वी झाली, याचा शोध घेतला, तर त्याचे उत्तर सापडते. राज्यात सहकार चळवळीला उत्तम व चांगले नेतृत्व लाभले. प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती तसेच विश्वस्त म्हणून काम करण्याचा संस्कार यामुळेही येथील सहकारी चळवळीच्या वाढीला चालना मिळाली. ‘लोकमान्य' संस्थेनेही आपल्या कृतीतून हाच आदर्श उभा केला आहे.
सहकारी सोसायटय़ांचा मोठा वाटा
महाराष्ट्राच्या कृषी व ग्रामीण क्षेत्रात सहकारी सोसायटय़ांचा मोठा वाटा आहे. याच सहकारी बँकांनी ग्रामीण भागात तळागाळातल्या लोकांना सहजपणे कर्ज उपलब्ध करून दिले. त्यांच्या कर्जामुळे अनेकांची आर्थिक प्रगती झाली. त्यांना रोजगार मिळाला. खरे तर गरीब घटक, छोटय़ा लोकांना कुणी कर्ज देत नाही. परंतु, हीच माणसे प्रामाणिकपणे कर्ज फेडतात. सहकारी संस्थांनी अशा छोटय़ा लोकांना कर्ज दिल्याने अर्थकारणाला गती आली. बेळगावात 28 साखर कारखाने आहेत. सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूरमध्येही मोठय़ा प्रमाणात साखर कारखाने आहेत. या भागाचा विकास दूध आणि ऊस पीक यातून प्रामुख्याने झाल्याचे दिसून येते. किंबहुना या विकास प्रक्रियेत सहकारी सोसायटय़ांची भूमिका अतिशय महत्वाची भूमिका राहिली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संपत्तीचे विकेंद्रीकरण हवे
भारत ही जगातील तिसरी अर्थव्यवस्था हे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. तथापि, आज ग्रामीण आणि शहर हे अंतर वाढत आहे. 60 ते 65 टक्के भाग शहरी झाला आहे. शहरात स्थलांतर वाढत असून मुंबई, दिल्ली, पुणे, कोलकाता या शहरांचा आकार क्षमतेपेक्षा जास्त वाढला आहे. मात्र, विकासाच समतोल ठेवायचा असेल, तर ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. देशाच्या जीडीपीमध्ये 24 टक्के उत्पादन क्षेत्र, 53 टक्के सेवा क्षेत्र, तर 12 टक्के कृषी विभागाचा वाटा आहे. मात्र, खेडय़ामध्ये मोठय़ा प्रमाणात जनता असूनही ग्रामीण भागात विकासदर कमी आहे. हे चित्र बदलले पाहिजे. गरीब माणसांचा विकास करायचा असेल, तर ग्रामीण भागातील सहकार चळवळ आणखी मजबूत करावी लागेल. त्याचबरोबर सत्तेचे नव्हे, तर संपत्तीचे विकेंद्रीकरण करावे लागेल, असे मतही गडकरी यांनी मांडले.
डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाचे कौतुक
डॉ. किरण ठाकुर यांनीही कमी भांडवलात संस्था सुरू केली. त्यांना किती त्रास झाला, याची मला चांगलीच कल्पना आहे. ‘तरुण भारत'च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेचा आवाज बुलंद ठेवला. त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आला तेव्हा मी भाजपाचा अध्यक्ष होतो. कर्नाटकमध्ये तेव्हा भाजपचे शासन होते व अधिवेशन सुरू होते. कन्नड, मराठी वादामुळे आमदारही आक्रमक होते. मात्र, विरोधात लिहिले म्हणून संपादकाला जेलमध्ये पाठवणे योग्य नाही, असे मी सांगितले. त्यामुळे कारवाई थांबली व ठाकुर यांची जेलवारी टळली. सोसायटी चालवतानाही त्यांना अडचणी आल्या. पण, त्यांनी चिकाटीने या अडचणींवर मात केली, असे सांगत डॉ. किरण ठाकुर यांच्या नेतृत्वाचे त्यांनी कौतुक केले.
ई रिक्षामुळे शोषण थांबले
2014 साळी देशात ई रिक्षा आणायची ठरवली. काही राज्यात हाताने रिक्षा ओढायची पद्धत होती. त्यात दोन कोटी लोकांचे शोषण होत होते. ईरिक्षामुळे हे शोषण थांबले. मुख्य म्हणजे या छोटय़ा रिक्षांना कर्ज देण्याचे काम सोसायटय़ांनी केले. लोकांना कर्ज मिळाल्याने रोजगार मिळाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विश्वनीयता हे 21 शतकातील मोठे भांडवल आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
सीमाप्रश्न सोडवू शकलो नाही
भाषेच्या आधारावर झालेल्या प्रांत रचनेचा प्रश्न अद्याप सुटलेली नाही. मागच्या काही वर्षांत आपण काही पाणीतंटेही मिटवले. पण महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद प्रश्न काही सोडवू शकलो नाही, असे त्यांनी सांगितले. देशात पाण्याची कमी नाही, नियोजनाची कमी आहे. माणूस जात, धर्म, पंथ याने मोठा होत नसतो, तर त्याच्या कर्तृत्वाने मोठ होत असतो. मधल्या भिंती उत्तम विचाराला अडचणी ठरत आहेत. आज जातीय अस्मिता वाढत आहेत. मात्र, गरीब माणसाला मोठे करण्यासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली.
गडकरी संकटमोचक नेतृत्व : डॉ. किरण ठाकुर
प्रास्ताविक करताना डॉ. किरण ठाकुर म्हणाले, की संकटे आली, तेव्हा गडकरी यांनी मदत केली. हक्कभंग असो वा संस्थेच्या अडचणी. ते नेहमी धावून आले. त्यांचे नेतृत्व संकटमोचक आहे. त्यांनी आज वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे आभार. लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा मंत्र प्रथम बेळगावात घुमवला. आम्ही तेथूनच स्वराज्याचे सुराज्य बनवायचे काम हाती घेतले आहे. समाज आर्थिकदृष्टय़ा संपन्न हवा, हे मॉडेल ठेऊन आम्ही काम करीत आहोत. कर्नाटकच्या सरकारच्या त्रासामुळेच पुण्यात मुख्य कार्यालय हलवले असून, लोकांना केंद्रस्थान ठेऊन ‘लोकमान्य' काम करत आहे. एक लाख लोकांना आम्ही रोजगार दिला आहे. याशिवाय मराठी संस्कृती टिकवायचे काम आम्ही बेळगाव, कारवार, गोव्यात करीत आहोत. आगामी काळात लोकमान्य कल्चरल युनिव्हर्सिटी स्थापन करणार असल्याचेही डॉ. ठाकुर यांनी सांगितले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले, तर विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी आभार मानले.