Diwali 2025: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 14:18 IST2025-10-22T14:18:06+5:302025-10-22T14:18:45+5:30
पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चैतन, उत्साह आणि आनंद भरणारा हा क्षण असून घराेघरी जय्यत तयारी सुरू आहे. आम्हाला काय गिफ्ट मिळणार याचीच महिलांना उत्सुकता

Diwali 2025: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत; आता उलगडणार नात्यांचे बंध, आज पाडवा, उद्या भाऊबीज
पुणे : चैतन्य, प्रकाश, उत्साह आणि आनंदाचा दिवा घराेघरी पेटवला गेला आणि दिवाळी उत्सवाला सुरुवात झाली. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेला आसमंत... आकर्षक रंगावली... तेजोमयी दीपमाला... फटाक्यांची आतषबाजी... अशा चैतन्यमयी वातावरणात पुणेकर दिवाळीचा आनंद घेत आहेत. दुकान, कार्यालये आणि घराेघरी मंगळवारी (दि. २१) लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यानंतर लहान-थाेरांनी फटाक्याची आतषबाजी करून आनंद द्विगुणित केला. आज अर्थात बुधवारी (दि. २२) दीपावली पाडवा (बलिप्रतिपदा) आहे. पती-पत्नीच्या नात्यांमध्ये चैतन, उत्साह आणि आनंद भरणारा हा क्षण आहे. त्यामुळे घराेघरी जय्यत तयारी सुरू आहे. आम्हाला काय गिफ्ट मिळणार याचीच महिलांना उत्सुकता आहे.
लक्ष्मीपूजनानंतरचा दिवस येताे ताे पती-पत्नीच्या प्रेमाचे नाते दृढ करणारा पाडवा. यंदा बुधवारी (दि. २२) पाडवा आहे आणि बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला भाऊबिजेचा सण गुरुवारी (दि. २३) साजरा हाेत आहे. यानिमित्त घरोघरी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व आनंदात आहेत. कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हटले असून, या दिवशी बलिपूजा करण्याची पद्धत आहे. याच कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवत सुरू होतो म्हणून याला दिवाळी पाडवा म्हटले जाते. हिंदू धर्म परंपरेत साडेतीन मुहूर्त शुभ मानले जातात. त्यापैकी हा अर्धा मुहूर्त आहे. याच दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची पद्धत आहे. गोवर्धनपूजा करण्याचीही प्रथा आहे. दिवाळीचा हा मुख्य दिवस मानला जाताे. यानंतरचा महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज असून, गुरुवारी (दि. २३) सर्वत्र बहीण भावाला ओवाळणार आहे. विशेष म्हणजे बहीण भावाला ओवाळताना ‘इडा पिडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे, आली वर्षाची दिवाळी साेन्या रूपाने ओवाळी’, अशी प्रार्थना करते.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी अर्थात शुक्रवारी सुवासिनींनी सवत्स गाईची पूजा केली. धनत्रयोदशीला यमदीपदान केले गेले. मंगलस्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून दीप लावला गेला. त्यानंतर नरक चतुर्दशी साजरी झाली. त्यापाठाेपाठ दीपावली पाडवा आणि भाऊबीज साजरा हाेत आहे. तत्पूर्वी मंगळवारी (दि. २१) रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत लक्ष्मी पूजन केले गेले. लक्ष लक्ष दिवे आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे संपूर्ण शहर उजळून निघाले हाेते. अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा केली गेली. लखलखत्या पणत्या आणि आकर्षक रोषणाईने आसमंत उजळून निघाला हाेता. नरक चतुर्दशी ते कार्तिक शुद्ध द्वितिया या चार दिवसांत गोडधोडाचे भोजन करून दिवाळी साजरी केली जात आहे. मंगळवारी (दि. २०) माता लक्ष्मी, गणपती आणि कुबेर यांची विधिवत पूजा करून धन-समृद्धीची कामना केली गेली.
आज पाडवा
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा केली जाते. चैत्र शुक्ल प्रतिपदेला शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेला विक्रम संवत्सर सुरू होते. या दिवशी पत्नीने पतीस ओवाळावे म्हणजे दोघांचेही आयुष्य वाढते, अशी धारणा आहे. याचबराेबर वहीपूजन आणि दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. पंचांगाप्रमाणे यासाठीचा मुहूर्त बुधवारी (दि. २२) पहाटे ३:०० ते ६:००, सकाळी ६:३० ते ९:३० आणि ११:०० ते १२:३० असा आहे.
उद्या भाऊबीज
नरक चतुर्दशी, अमावास्या व बलिप्रतिपदा हे दिवाळीचे मुख्य तीन दिवस आहेत. याला जोडूनच भाऊबीज येते. कार्तिक शुक्ल द्वितीयेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीच्या हातचे भोजन करून बहिणीचा सत्कार करीत असे, अशी पुराणात गोष्ट आहे. म्हणून या दिवशी बहिणीने भावाला जेवावयास बोलावून त्याला ओवाळावे, असे सांगितले असल्याचे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले आहे. भावाची पूजा म्हणजे यमराजाच्या पाशातून भावाची सुटका व्हावी यासाठी बहिणीने केलेली प्रार्थना हाेय. यानंतर भाऊ यथाशक्तीप्रमाणे पैसे कापड दागिना आदी वस्तू ओवाळणी म्हणून बहिणीला देतो. यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावाबद्दलचे दुःख थोडेसे हलके झाले तेव्हापासून भाऊबीजेची प्रथा पडली, अशी याबद्दलची आख्यायिका आहे.