पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:23 IST2023-06-27T09:32:23+5:302023-06-27T10:23:27+5:30
इमारत अंत्यत धोकादायक झाल्याने पावसामुळे इमारतीच्या छतामध्ये पाणी मुरले आणि छत आणखीच कमकुवत होऊन घटना घडली

पावसामुळे इमारतीचे छत कोसळले; मातीखाली गाडले गेल्याने एकाचा मृत्यू , कॅम्प परिसरातील घटना
लष्कर : गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कॅम्प परिसरातील धोकादायक इमारतीचे छत कोसळले. त्याखाली सापडून एकाचा मृत्यू झाला, तर एकजण किरकोळ जखमी झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कॅम्प परिसरातील दस्तुर मेहेर रस्त्यावर घडली. स्टॅन्ली डिसुझा (वय ५७) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर जेरी डिसुझा (वय ४६) हे जखमी झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, कॅम्प परिसरातील दस्तुर मेहेर रस्त्यावरील घर क्रमांक ८३० ची इमारत अत्यंत धोकादायक बनली होती. कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे इमारतीच्या छतामध्ये पाणी मुरले आणि छत आणखीच कमकुवत झाले. घरामध्ये सायंकाळी स्टॅन्ली व जेरी डिसुझा हे दोघे भाऊ हॉलमध्ये टीव्ही पाहत होते. तर त्यांच्या पत्नी स्वयंपाक घरात कामात होत्या. सायंकाळी साडेसातच्या सुमारास अचानक हॉलचे स्लॅब कोसळले त्याखाली स्टॅन्ली डिसुझा अक्षरश: गाडले गेले. तर शेजारी असलेल्या जेरी डिसुझा यांच्या अंगावरही दगड-माती पडली. स्टॅन्ली यांना ढिगाऱ्याखालून काढून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घरात अडकलेल्या महिलांना अग्निशामक दलाच्या जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. पावसामुळेच कुजलेले स्लॅब पडल्याची माहिती अग्निशमन दल अधीक्षक रोहित रणपिसे यांनी दिली.
दुर्घटनेची माहिती मिळताच बोर्डाचे अभियंता सुखदेव पाटील घटनास्थळी पोहोचले व त्यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्या ठिकाणी विद्युत पुरवठा बंद केला. अग्निशमन दलाकडून या कार्यवाहीत तांडेल विकास खराडे, फायरमन अनिल ताजने, दिनेश शिंदे, ओमकार जगताप, अविनाश बोरुडे आदीनी सहभाग घेतला.