‘पीएमपी’च्या बसचालकाने सहकाऱ्याच्या कानाचा चावा घेऊन तोडला लचका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 10:03 IST2024-03-22T10:03:14+5:302024-03-22T10:03:43+5:30
दोघेही एकाच ठिकाणी कामाला असून किरकोळ कारणावरून वादविवाद झाले होते

‘पीएमपी’च्या बसचालकाने सहकाऱ्याच्या कानाचा चावा घेऊन तोडला लचका!
पुणे : गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने ‘पीएमपीएमएल’च्या बसचालकाने सहकाऱ्याला शिवीगाळ करून चक्क त्याच्या कानाचा लचका तोडल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कोरे नावाच्या बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, प्रदीप अण्णासाहेब सुतार (वय ४१, रा. पुरंदर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगर बस डेपोमध्ये मंगळवारी (दि.१९) रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकाच ठिकाणी कामाला आहेत. मंगळवारी रात्री फिर्यादी हे त्यांच्या चारचाकी गाडीतून जात होते. त्यावेळी त्यांनी आरोपीला गाडी बाजूला घे, असे सांगितले. याचा राग आल्याने कोरे याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुतार यांच्या कानाचा चावा घेऊन लचका तोडला, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.