शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
By किरण शिंदे | Updated: November 23, 2025 17:43 IST2025-11-23T17:40:29+5:302025-11-23T17:43:15+5:30
पुणे शहर पोलिसांनी उमरती गावात केलेल्या धडक कारवाईनंतर महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत.

शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
पुणे शहर पोलिसांनी उमरती गावात केलेल्या धडक कारवाईनंतर महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण ऑपरेशनचे तपशील दिले. आठ जणांवर कारवाई करत अनेक देशी कट्टे, पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि पिस्तूल तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
आयुक्त कुमार म्हणाले की, शरद मोहोळ हत्येत वापरलेले पिस्तूलदेखील आरोपींनी याच उमरती गावातून आणले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. ५ जानेवारी २०२४ रोजी गोळ्या झाडून शरद मोहोळ याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी १५ पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. यातील पिस्तूल हे उमरटी गावातूनच आल्याचे निष्पन्न झाले होते. याशिवाय पुण्यातील वेगवेगळ्या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल उमरटी गावातूनच आणण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे या परिसरातील अवैध शस्त्रपुरवठा साखळी मोडित काढणे अत्यंत गरजेचे होते.
पिस्तूल कारखाने उद्ध्वस्त करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वीच झाला होता अशी माहितीही आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यातील गुन्हेगारी संघटनांना शस्त्रसाठा पुरवण्याचे मूळ स्रोतच संपवण्याचा निर्णय पोलिसांनी १५ दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार उमरती गावातील पिस्तूल बनवण्याचे अड्डे हद्दपार करण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली.
आयुक्त कुमार म्हणाले, उमरती गावाच्या भौगोलिक स्थितीमुळे आणि स्थानिकांच्या काहींना असलेल्या पाठिंब्यामुळे परिस्थिती कठीण होती. आमच्यावर हल्ला होण्याचा अंदाजही होता. तरीही कोणत्याही परिस्थितीत कारवाई करायचीच असा निर्णय घेतला होता. त्यानुसार पूर्व तयारी करूनच पुणे पोलिस कारवाईसाठी गेले होते.
अटक आरोपींवर मोक्का, गँग सदस्यांवर कारवाई
कारवाईत पकडलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. याशिवाय, पुण्यातील अनेक गँग सदस्यांचे या गावाशी संबंध असल्याचेही उघड झाले असून त्यांच्यावरही लवकरच कठोर कारवाई होणार आहे.
या धडक कारवाईत योगदान दिलेल्या १०५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १०,००० रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा आयुक्तांनी केली. कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न करता काम केलेल्या दलाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.