जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 13:32 IST2024-09-23T13:31:29+5:302024-09-23T13:32:13+5:30
माझ्या यशामागे आई-वडिलांचे सर्वात जास्त श्रेय असल्याचे चक्रधर गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले

जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर गाठलं यशाचं शिखर; शेतकऱ्याचा मुलगा झाला पीएसआय
धानोरे : जिद्द, चिकाटी अन् मेहनतीच्या जोरावर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. असं एक उदाहरण शिरूर तालुक्यात पाहायला मिळालं. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील चक्रधर बाळासाहेब गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून २०२२ मध्ये झालेल्या पूर्व परीक्षेत व मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तुंग यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षकपद मिळवले.
चक्रधर यांचे वडील बाळासाहेब व आई यमुनाबाई दोघेही शेती करतात. चक्रधर यांना लहानपणापासून अभ्यासाची आवड तसेच जिद्द, चिकाटी असल्याने त्यांना हे यश मिळाले असल्याचे आई यमुनाबाई गायकवाड यांनी सांगितले. गायकवाड यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण संभाजीराव भुजबळ विद्यालयात झाले. यशामागे माझ्या आई-वडिलांचे सर्वात जास्त श्रेय आहे असे गायकवाड यांनी निवडीनंतर सांगितले. निवडीनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तळेगाव ढमढेरे ग्रामस्थांच्या वतीने पोलिस उपनिरीक्षकपदी नव्याने निवड झालेल्या चक्रधर गायकवाड यांचा संत शिरोमणी सावता महाराज मंगल कार्यालयामध्ये ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शेतकरी अन् मुलगा दोघेही करणार सेवा
चक्रधर यांचे आई वडील हे शेतकरी आहेत. ते अन्नदाता म्ह्णून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवतायेत. तर आता त्यांचा मुलगा चक्रधर आता पोलीस सेवेत कार्यरत होणार आहे. म्हणजे तोही तिथून पुढे आपली सेवाच करणार आहे. चक्रधर गायकवाड यांचे पूर्ण कुटुंबच एका प्रकारे समाजसेवेत सक्रिय असल्याचे यामधून दिसत आहे.