असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:19 IST2025-10-22T13:18:29+5:302025-10-22T13:19:27+5:30
वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा

असंख्य लोक गावी गेल्याने पुण्यात वाहनांची संख्या कमी; रिकाम्या रस्त्यांवर वाहतुक नियम पाळा, पोलिसांचे आवाहन
पुणे : दिवाळी सणासाठी अनेकजण आपल्या मूळ गावी गेल्याने शहरातील वाहनांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील रस्ते रिकामे झाल्याचे चित्र आहे. रिकामे रस्ते म्हणजे सुरक्षित रस्ते असे नाही. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पुणे शहरात शिक्षण, नोकरी व सेवानिवृत्तीनंतरचे जीवन, आदी कारणांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देशभरातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शहरातील वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र, शहरात स्थायिक झालेले किंवा शैक्षणिक, नोकरीच्या निमित्ताने काही कालावधीसाठी शहरात राहणारे, अनेकजण दिवाळी सणासाठी आपल्या मूळ गावी जातात. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होते आणि रस्ते रिकामे दिसतात. असेच चित्र सध्या शहरात दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी नागरिकांना व वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. रिकामे रस्ते म्हणजे सुरक्षित रस्ते नव्हेत; त्यामुळे वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, सिग्नल तोडू नये, मोबाइल वापरत वाहन चालवू नये, सीटबेल्ट व हेल्मेटचा वापरावा, मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.