पुण्याच्या बापलेकाची कमाल; पितापुत्र ठरले ‘आयर्नमॅन’, जिद्द, ध्येय अन् नात्याची प्रेरणादायी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:46 IST2026-04-06T13:45:12+5:302026-04-06T13:46:18+5:30

पुण्याच्या या पितापुत्रांनी २२६ किमी अंतराची खडतर स्पर्धा १७ तासांच्या आत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली

The miracle of Pune's father and son Father and son become 'Ironman', an inspiring story of determination, goals and relationships | पुण्याच्या बापलेकाची कमाल; पितापुत्र ठरले ‘आयर्नमॅन’, जिद्द, ध्येय अन् नात्याची प्रेरणादायी कहाणी

पुण्याच्या बापलेकाची कमाल; पितापुत्र ठरले ‘आयर्नमॅन’, जिद्द, ध्येय अन् नात्याची प्रेरणादायी कहाणी

पांडुरंग मरगजे

धनकवडी : न्यूझीलंडमधील तावपो येथे नुकतीच पार पडलेल्या आयर्नमॅन स्पर्धेत पुण्यातील विष्णू नाथा ताम्हाणे (वय ५८) आणि त्यांचा मुलगा गौरांग ताम्हाणे (वय १९) या पितापुत्रांनी २२६ किमी अंतराची खडतर स्पर्धा १७ तासांच्या आत पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी केली. जगभरातील १००८ स्पर्धकांसोबत त्यांनी आपली छाप उमटवली.

या स्पर्धेत ४ किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि ४२ किमी धावणे असा अत्यंत कठीण टप्पा असतो. तावपो येथील १० ते १५ अंश सेल्सियस थंड वातावरण, गोठवणारे पाणी, तसेच १४०० मीटर उंचीचे चढउतार अशा आव्हानांवर मात करत दोघांनीही ही स्पर्धा पूर्ण केली. विशेष म्हणजे गौरांगने वडिलांपेक्षा ४ मिनिटे आधी फिनिश लाईन पार करत ‘जब तुम मुझे हराओगे, तब मैं जीत जाऊंगा’ या भावनेला प्रत्यक्षात उतरवले.

यापूर्वी विष्णू ताम्हणे यांनी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. सध्या ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागात अपर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. विष्णू ताम्हाणे यांनी फिटनेसचा प्रवास आई-वडिलाच्या प्रेरणेतून सुरू केला. मुलगा गौरांगला घडवत त्यांनी मागील चार वर्षांत दुबई, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यासाठी त्यांना पत्नी सुनीता ताम्हाणे यांनी खंबीरपणे साथ दिली.

ही स्पर्धा जिंकणं म्हणजे फक्त वैयक्तिक यश नव्हे, तर मुलासोबत अनुभवलेला आयुष्यातला अनमोल प्रवास आहे. गौरांग माझ्यापेक्षा आधी फिनिश लाईन पार करताना पाहणं, हीच माझ्यासाठी खरी विजयाची भावना होती. वय कधीच अडथळा नसतो, जिद्द, शिस्त आणि सातत्य असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. प्रत्येक पालकाने मुलांसोबत ध्येय ठरवून, त्यांच्यासोबत राहून ते साकार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. - विष्णू ताम्हणे, अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग.

Web Title: The miracle of Pune's father and son Father and son become 'Ironman', an inspiring story of determination, goals and relationships