'महायुतीचे सरकार ३ पक्षांचे, वाट्याला येणाऱ्या जागा कमी', अजित पवारांनी घेतली पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 12:34 IST2025-11-09T12:33:30+5:302025-11-09T12:34:20+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कमी वेळ, नव्यांना पक्षप्रवेश देताना नवा-जुन्याचा वाद न घालता सन्मानाने वागवून सहकार्य करावे

'महायुतीचे सरकार ३ पक्षांचे, वाट्याला येणाऱ्या जागा कमी', अजित पवारांनी घेतली पुण्यात कार्यकर्त्यांसोबत बैठक
पुणे : जिल्ह्यात काही दिवसांपासून भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच महार वतन जमीन खरेदी प्रकरणाची त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे शनिवारी पुण्यातील कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या तालुक्यांमध्ये गटबाजी, तसेच मित्रपक्षांबरोबर असलेली धुसफुस कमी करण्यासाठी खेड, शिरुर, दौंड आणि जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी व महत्त्वाच्या कार्यकार्त्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, चाकणमधील शिंदे गटाच्या विजया जाधव यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती, त्यानंतर शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती जरी अस्तित्वात असली, तरी मात्र स्थानिक पातळीवर नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आघाडी किंवा महायुती कितपत सक्रिय राहील, याविषयी मात्र साशंकता व्यक्त होत आहे. सध्या कोणत्याही पक्षाने स्थानिक पातळीवर स्वबळावर लढायचे की, आघाडी करून लढायचे, याबाबत कोणतेही संकेत दिले नाही. त्यामुळे इच्छुकांमध्ये आता काय करायचे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच भाजपने स्वबळावर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये कमळ कसे फुलवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
काही ठिकाणी आरक्षणामुळे अनेकांची गणिते बिघडली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये इनकमिंग सुरू आहे. आपल्या प्रभाग आणि गटातीलच स्वपक्षातील प्रतिस्पर्धी दुसऱ्या पक्षात गेले आणि भविष्यात महायुती म्हणून लढायचे ठरले, तर आपल्याला उमेदवारी मिळणार की नाही, याची धास्ती इच्छुकांनी घेतली आहे. याशिवाय पक्षातील स्थानिक पातळीवर असलेली गटबाजीही उफाळून येत आहे. दोन-तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक झाली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड, आळंदी, शिरुर, दौंड, जुन्नर आणि भोर तालुक्यातील काही प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांनी पवारांकडे वेळ मागितली होती. त्यानुसार, शनिवारी पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली.
आमदारांना उमेदवार निवडीचे अधिकारी
बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक आमदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गट-गण, तसेच नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार निवडीचे अधिकारी देण्यात आले आहे. खेड आणि जुन्नर तालुक्यातील सर्वअधिकारी अनुक्रमे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, तसेच अतुल बेनके यांना देण्यात आले आहे.
रुसवे-फुगवे दूर करण्याचा प्रयत्न
स्थानिक इच्छुक उमेदवारांनी केलेल्या कामांची अजित पवार यांनी माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर, पक्षातील गटबाजी, हेवेदावे दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांनी उमेदवारीसाही काही जणांची चाचपणीही केली.
तीन नगरपरिषदांमध्ये भाजपबरोबर युती
खेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने मदत केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपबरोबर युती करण्याचा प्रस्ताव माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी यावेळी मांडला. त्याला अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे खेडमधील राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी नगरपरिषदेची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढवणार असल्याचे मोहिते-पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दरम्यान, भाजपशी युती करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेश अजित पवारांनी दिले असल्याचे समजते.
सर्वांना संधी देणे शक्य नाही : अजित पवार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीच्या शेवटपर्यंत पार पडणार आहेत. महायुतीचे सरकार तीन पक्षांचे आहे. त्यामुळे वाट्याला येणाऱ्या जागा कमी आहेत. ज्यांना उमेदवारी देता येत नाही, अशांना जिल्हा नियोजन समितीसह इतर समित्यांमध्ये सामावून घेतले जाईल, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातील पक्ष कार्यालयात राजगड, मुळशी, भोर भागातील अनेकांनी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. पवार म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कमी वेळ आहे. नव्यांना पक्षप्रवेश देताना नवा-जुन्याचा वाद न घालता सन्मानाने वागवून सहकार्य करावे. अनेक वर्षे मी पुण्याचा पालकमंत्री आहे. मात्र, मुळशी भागात आमच्या विचारांचा आमदार नसल्याने काम करताना अडचणी येत होत्या. आता शंकर मांडेकर आमदार झाल्याने त्यांना पीएमआरडीए आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच आमदार निधी, जिल्हा परिषदेचा निधी अशा विविध स्रोतांमधून मदत केली जात आहे.