बिबट्या औंधमधून बाहेर पडला की कोण्या सोसायटीत दबा धरून बसलाय! या विचाराने स्थानिक भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 10:57 IST2025-11-25T10:55:56+5:302025-11-25T10:57:21+5:30
बिबट्या कोणत्या दिशने गेला असेल?, किती लांब गेला असेल?, त्याच्या पायाचे ठसे, विष्ठा, केस आदी तांत्रिक गोष्टी मिळविण्यातही वन विभागाला अपयश

बिबट्या औंधमधून बाहेर पडला की कोण्या सोसायटीत दबा धरून बसलाय! या विचाराने स्थानिक भयभीत
पुणे: औंध परिसरातील आरबीआय क्वार्टर परिसरत २३ नोव्हेंबर (रविवारी) रोजी पहाटे बिबट्या सीसीटीव्हीत कैद झाला. त्यामुळे तालुक्यात दहशत माजविणाऱ्या बिबट्याने आता पुणे शहरात एन्ट्री केल्याचे सिद्ध झाले. गर्द मानवी वस्ती असलेल्या या परिसरात बिबट्या तीन-चार सोसायटीच्या कुंपणावरून मॉर्निंग वॉक केल्याचे सीसीटीव्हीत दिसत असले, तरी त्यानंतर बिबट्या कोणत्या मार्गे कुठे गायब झाला, हे वन विभागाला ४८ तासांनंतरही शोधता आले नाही. त्यामुळे बिबट्या शहरातून बाहेर पडला की कोण्या सोसायटीत दबा धरून बसला आहे, या विचाराने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.
२३ (रविवारी) तारखेच्या पहाटे ३:४० वाजता औंधमधील आरबीआय क्वार्टरमधील सीसीटीव्हीच्या कक्षेत बिबट्या आल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाने पाहिले. त्यानंतर सकाळी त्याने ही माहिती सोसायटीतील रहिवाशांना दिली. त्यामुळे रहिवाशांनी सीसीटीव्ही तपासल्यावर बिबट्या सीसीटीव्हीत दिसला. त्यामुळे वनरक्षकांना बिबट्याचा वावर असल्याचे कोणत्याही तपासाविना मान्य करावे लागले. एरवी बिबट्याच्या पायांचे ठसे, त्याचे केस वगैरे कारकुनी कामामध्ये बिबट्याचा वावर सांगण्यात उशीर लावणाऱ्या वन विभागाला सीसीटीव्हीचा पुरावाच दाखविल्यामुळे त्यांना बिबट्याचा वावर मान्य करावाच लागला. मात्र, त्यानंतर आता हा बिबट्या गेला कुठे, याचा तपास करण्यात वन विभागाचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. बिबट्या कोणत्या मार्गे आला, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत असले, तरी आरबीआय क्वार्टर परिसरातील कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून गेल्यानंतर बिबट्या कोणत्या दिशेने गेला, याचा थांगपत्ता वन विभागाला लागलेला नाही. बिबट्या कोणत्या दिशने गेला असेल?, किती लांब गेला असेल?, त्याच्या पायाचे ठसे, विष्ठा, केस आदी तांत्रिक गोष्टी मिळविण्यातही वन विभागाला अपयश आले असून, वन विभागाच्या ड्राेनला बिबट्या दिसला नाही. त्यामुळे बिबट्या गायब कुठे झाला, हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रविवार, २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:३७ ते ३:५० पर्यंत आरबीआय क्वार्टरच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसत आहे. त्यानंतर तो सिंध कॉलनीमध्ये गेला. सिंध कॉलनी, नॅशनल सोसायटी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली; पण बिबट्या कोठेही आढळून आलेला नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. बिबट्या सापडल्याचे फोटो व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकू नयेत. वन विभागाच्या दोन टीम सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याद्वारे तपासणी करत आहे. संशयास्पद गोष्ट दिसल्यास वनविभागाच्या १९२६ या नंबरवर फोन करावा. -विशाल यादव, वनपाल, भांबुर्डा वन विभाग, पुणे
पुनीत कुमारमुळे बिबट्याची मिळाली माहीत
रविवारी पहाटे बिबट्या आल्याची सगळ्यात पहिली माहिती मिळाली तरी आर बीआय क्वार्टरचे वाॅचमन पुनीत कुमार यांना. साधारणपणे इतर सोासायटीमध्ये मध्यरात्रीनंतर वॉचमन गेट बंद करून झोपतात परंतु पुनीत कुमार हे पहाटे साखर झोपेच्या वेळेसही इमाने इतबारे चोख ड्युटी बजावत होते. त्यांच्या केबिन मध्ये बसून ते त्यांच्यासमोरील स्क्रीनवर सीसीटीव्हीचे चित्रण पहात होते. त्यांना संशयास्पद गोष्ट दिसल्यावर त्यांनी लगेच सहकारी वॉचमन हनुमंत चाकोरे यांना माहिती दिली. त्यानंतर नीट निरीक्षण केल्यावर त्यांना तो बिबट्या असल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी सोसायटीच्या सचिवांना माहिती दिली. त्यामुळे सर्व नागरिक सावध झाले. सचिवांनी पोलिस व वनविभागाला माहिती कळविली.