Video: मगरपट्टा सिटीमागील मुठा उजवा कालवा फुटला; रस्ते जलमय, हडपसरमध्ये दिवसभर वाहतूक कोंडीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:01 IST2026-03-23T12:00:10+5:302026-03-23T12:01:27+5:30

या घटनेमुळे आज दिवसभर हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची तीव्र शक्यता असून नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे

The large right canal behind Magarpatta City burst; roads flooded, traffic jam likely in Hadapsar throughout the day | Video: मगरपट्टा सिटीमागील मुठा उजवा कालवा फुटला; रस्ते जलमय, हडपसरमध्ये दिवसभर वाहतूक कोंडीची शक्यता

Video: मगरपट्टा सिटीमागील मुठा उजवा कालवा फुटला; रस्ते जलमय, हडपसरमध्ये दिवसभर वाहतूक कोंडीची शक्यता

हडपसर: मगरपट्टा सिटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या नवीन  मुठा उजवा कालवा आज पहाटे फुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कालव्याचा भराव कमकुवत होऊन कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी मगरपट्टा सिटीतील अंतर्गत रस्त्यांवर शिरले, तर काही ठिकाणी ड्रेनेजमधूनही पाणी उलट बाहेर येत हडपसर  औद्योगिक वसाहत परिसरातील अनेक रस्ते अक्षरशः जलमय झाले. या घटनेमुळे मगरपट्टा सिटी, हडपसर इंडस्ट्रियल एरिया आणि कीर्तने बागेपर्यंत वाहतुकीचा पूर्णतः बोजवारा उडाला असून नागरिकांना दिवसभर मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी सुमारे सहाच्या सुमारास मगरपट्टा सिटीच्या मागील बाजूस असलेल्या या कालव्यातून सुरुवातीला किरकोळ प्रमाणात पाणी झिरपू लागले. मात्र संबंधित ठिकाणी असलेल्या ड्रेनेज अॅक्वाडक्टमुळे कालव्याचा भराव आतून कमकुवत झाल्याने काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली. सुरुवातीला थोड्याथोडक्या प्रमाणात बाहेर पडणारे पाणी अचानक वेगाने वाढले आणि खालून वरपर्यंत कालव्याचा भराव निघाल्याने प्रचंड प्रमाणात पाणी बाहेर पडले.

या पाण्याचा सर्वाधिक फटका मगरपट्टा सिटीतील अंतर्गत रस्त्यांना बसला. काही मिनिटांतच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचू लागले. यानंतर हेच पाणी कालव्याखालील ड्रेनेज अॅक्वाडक्टमधून पुढे हडपसर इंडस्ट्रियल एरियातील ड्रेनेज लाईनमध्ये घुसले, परिणामी ड्रेनेजमधूनही पाणी उलट बाहेर येऊ लागले. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनत हे पाणी कीर्तने बागेपर्यंत पोहोचल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

परिसरातील अनेक रस्त्यांवर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने वाहनचालकांची अक्षरशः तारांबळ उडाली. पाण्यातून मार्ग काढताना अनेक दुचाकी बंद पडल्या, तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांनाही अडथळा निर्माण झाला. काही अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने वाहनचालकांनी मुख्य मार्गांचा आधार घेतला; परिणामी हडपसर मुख्य रस्ता, मगरपट्टा चौक आणि आसपासच्या मार्गांवर मोठा वाहतूक ताण निर्माण झाला.

दरम्यान, या घटनेमुळे आज दिवसभर हडपसर परिसरात वाहतूक कोंडीची तीव्र शक्यता असून नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दरम्यान खडकवासला धरणातून पाणी सकाळी 7 वाजता बंद करण्यात आले असून पूर्णपणे पाणी बंद होण्यास दुपारच्या तीन वाजण्याची शक्यता आहे. सध्या भराव टाकण्याचे काम सुरु केले असून लष्कर व पर्वती जलकेंद्रात पाणी घेण्याचे काम सुरु केले असेल्याचे पाठबधारे विभागाने सांगितले. 

Web Title : मगरपट्टा सिटी में नहर टूटी; हडपसर में ट्रैफिक जाम की आशंका

Web Summary : मगरपट्टा सिटी के पीछे नहर टूटने से सड़कों पर पानी भर गया, जिससे हडपसर में ट्रैफिक जाम हो गया। कमजोर तटबंध के कारण नहर टूटी, जिससे आंतरिक सड़कें और जल निकासी लाइनें जलमग्न हो गईं। यातायात बाधित है, और यात्रियों को वैकल्पिक मार्गों का उपयोग करने की सलाह दी जाती है। पानी की निकासी रुकी; मरम्मत जारी।

Web Title : Canal Breach Floods Magarpatta City; Traffic Snarls Expected in Hadapsar

Web Summary : A canal breach behind Magarpatta City flooded roads, causing traffic chaos in Hadapsar. The breach, due to a weakened embankment, inundated internal roads and drainage lines. Traffic is severely disrupted, and commuters are advised to use alternative routes. Water discharge halted; repairs underway.