जिथे माज केला, तिथेच 'धिंड' काढली, तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 12:14 IST2025-04-16T12:11:57+5:302025-04-16T12:14:26+5:30
चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी आणि त्याच्या एका साथीदाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली

जिथे माज केला, तिथेच 'धिंड' काढली, तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा
धनकवडी : सिंहगड कॉलेज परिसरात कोयत्याने हल्ला करुन दहशत पसरवणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून ज्या परिसरात कोयता घेऊन दहशत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याच ठिकाणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींची वरात काढली. तन्मय सखाराम भुयारी ( वय २० रा. सध्या सिंहगड कॅम्पस, वडगाव, पुणे मुळ रा. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड कॉलेज परिसरातील चंद्रागण कॅपिटल या मुख्य इमारतीच्या गेटजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. ८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबलेल्या तरुणावर आरोपी तन्मय भुयारी आणि त्याच्या एका साथीदाराने कोयत्याने वार केल्याची घटना घडली. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी भारती विद्यापीठ पोलिसांचे तपास पथक विविध भागात रवाना करण्यात आले होते. यातील आरोपी काही तासात ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून या आरोपींकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी, व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.