"राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे घेऊन फिरतात, त्याच्या..."; पुण्यातील गोळीबारावरून रोहित पवारांनी सरकारला केलं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:43 IST2025-09-18T12:39:10+5:302025-09-18T12:43:57+5:30
Ram Shinde vs Rohit Pawar: पुण्यात घायवळ टोळीच्या गुंडांनी एका व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली. निलेश घायवळ सोबत फिरतानाचा राम शिंदेंचा संदर्भात रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.

"राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे घेऊन फिरतात, त्याच्या..."; पुण्यातील गोळीबारावरून रोहित पवारांनी सरकारला केलं लक्ष्य
Pune Firing News: पुण्यातील कोथरूड भागात बुधवारी मध्यरात्री गुंड निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात एक व्यक्ती जखमी झाला आहे. मध्यरात्री पुण्यात झालेल्या या गोळीबाराने खळबळ उडाली असून, आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा उल्लेख करत कारवाई करणार की नाही, असा सवाल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यात घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारला घेरले. रोहित पवारांनी थेट विधानसभेचे सभापती राम शिंदे यांचे नाव घेतले. निलेश घायवळला ते विधानभवनात घेऊन फिरतात, असे ते म्हणाले.
राम शिंदेंचं नाव घेत रोहित पवार काय बोलले?
रोहित पवारांनी म्हटलं आहे की, "विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे ज्या गुंडाला राजरोसपणे विधानभवनात घेऊन फिरतात त्याच्या टोळीने गाडीला साईड न दिल्याच्या रागातून पुण्यात (कोथरुड) भर रस्त्यात गोळीबार करून एका वाहनचालकाला जखमी केलं."
"आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या गुंडाच्या टोळीवर काय कारवाई करतात की, हा गुंड विधानपरिषदेच्या सभापती महोदयांचा खास माणूस आहे म्हणून त्याला हमखास पाठीशी घालतात, हेच पहायचंय. या कारवाईनंतर हे सरकार सामान्य माणसाचं आहे की गुंडांचं हे कळणार आहे", असे म्हणत रोहित पवारांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
पुण्यात गोळीबार, नक्की काय घडलं?
कोथरूडमधील मुठेश्वर मित्र मंडळासमोर बुधवारी रात्री ही घटना घडली. प्रकाश धुमाळ (वय ३६) हा मित्रांसोबत उभा होता. दुचाकी जाण्यासाठी वाट न दिल्याच्या मुद्द्यावरून घायवळ टोळीतील लोकांसोबत त्याचा वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयूर कुंभारे, मुसा शेख, रोहित आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला.
मयूर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारात प्रकाश धुमाळ हा जखमी झाला. त्याच्या मानेला, मांडीत गोळी लागली. त्यामुळे त्याला प्रचंड रक्तस्राव झाला. जीव वाचवण्यासाठी तो तो तिथून पळून गेला. रक्तबंबाळ अवस्थेत पळताना त्याच्या रक्ताचे डाग परिसरात पडले. सध्या सह्याद्री रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे.