बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 19:56 IST2025-03-14T19:55:57+5:302025-03-14T19:56:40+5:30

नैसर्गिक रंगाचा वापर करत लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरलेले चेहरे दिसत होते

The festival of holi is celebrated with joy everywhere in Pune | बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

बुरा न मानो होली हैं...! पुण्यात सर्वत्र धूलिवंदनाचा रंगोत्सव जल्लोषात साजरा

पुणे: बुरा न मानो होली हैं, रंग बरसे, डीजेवरील गाण्यांवर लहान मुलांसह तरुणाई आणि ज्येष्ठांनीही ठेका धरत शहरातील विविध भागांत शुक्रवारी (दि.१४) धूलिवंदनाचा उत्सव साजरा केला. घरोघरी मिष्टान्न भोजनाचा बेत आणि मुक्तपणे एकमेकांना रंग लावण्यात दंग असलेल्या तरुणाईने धूलिवंदनाचा आनंद लुटला.

होलिका दहनानंतर धूलिवंदनाच्या दिवशी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत उत्साह कायम होता. नैसर्गिक रंगाचा वापर करत लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी अशा विविध रंगांनी भरलेले चेहरे दिसत होते. कोणी मित्रांसोबत, तर कोणी सोसायटीत मोठ्या उत्साहात रंगांची उधळण केली, तर दुसरीकडे इव्हेंटमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईचा जल्लोष दिसून आला. अनेक ठिकाणी सेलिब्रिटी डीजेंना बोलविण्यात आले होते. रंगोत्सवानंतर हॉटेल्स आणि कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.

तरुण-तरुणींनी केला जल्लोष 

हॉस्टेल्समधील तरुण-तरुणींनीही डीजेच्या तालावर ठेका धरत जल्लोषपूर्ण वातावरणात रंगोत्सव साजरा केला. अनेक प्रकारे रंगलेल्या चेहऱ्यांनी मित्रांसह दिसून आले. गाड्यांवरून एकमेकांच्या घरी जाऊन रंग खेळणारे तरुण-तरुणी या उत्सवाचा आनंद घेत होते. महिलाही होळीचा आनंद लुटताना दिसल्या. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पेठांसह डेक्कन, पर्वती आणि शहरातील उपनगरांमध्ये मोठा जल्लोष दिसून आला.

इव्हेंट रंगोत्सवात तरुणाईचा लक्षणीय सहभाग 

आयटी कंपन्या, शिक्षणाचे माहेरघर आणि विविध व्यवसायानिमित्ताने शहरात आलेल्या नागरिकांचा आणि तरुणाईंचा धूलिवंदन साजरा करण्याचा कल इव्हेंटकडे मोठ्या प्रमाणात दिसला. महाविद्यालयाचे तरुण ग्रुपने यात सामील झाल्याचे चित्र लक्षणीय होते. तसेच याठिकाणी सेलिब्रिटी डीजेंना देखील बोलविण्यात आले होते.

भोई प्रतिष्ठानतर्फे विशेष मुलांसाठी रंग बरसे स्तुत्य उपक्रम

रंग बरसे भिगे चुनरवाली... यासह अन्य गाणी, रंगांचा आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव, पाण्याचे फवारे करीत विशेष मुलांनी धुलीवंदनानिमित्त रंगोत्सवाचा आनंद लुटला. भोई प्रतिष्ठानच्या वतीने रंग बरसे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेष मुले, रेल्वे प्लॅटफॉर्मवर बूट पॉलिश करणारी मुले, कातकरी समाजाची मुले, ऊसतोडणी कामगारांची मुले, डोंबारी खेळ करणारी मुले, दिव्यांग मुले, मतिमंद मुले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले अशी अडीच हजारांपेक्षा जास्त मुले सहभागी झाली होती. या उपक्रमाचे संयोजक प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी गेली तीस वर्षे हा उपक्रम आयोजित करत आहोत, असे सांगितले.

Web Title: The festival of holi is celebrated with joy everywhere in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.