देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 09:51 IST2025-12-02T09:50:32+5:302025-12-02T09:51:22+5:30
आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता जगभरातील लोक ऐकतात, कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे

देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा जनता उभी राहते - सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
पुणे: अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, कळस लागला. आता राष्ट्र मंदिर उभे करायचे आहे. भारत देश मोठा करणे हे केवळ संघाचे काम नाही. देशाचे भाग्य तेव्हाच बदलते, जेव्हा देशातील जनता उभी राहते. संपूर्ण समाज संघटित झाला तरच राष्ट्रवैभव संपन्न होईल आणि विश्वाचे कल्याण होईल, त्यासाठी समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला पाहिजे, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. आपल्या पंतप्रधानांना आता जगभरातील लोक ऐकतात. कारण भारताची शक्ती जगाला समजली आहे. तुम्ही ३० वर्षे उशिरा का आलात?, असे काहीजण विचारतात. आम्ही पूर्वीपासून इथेच आहोत, तुम्हाला आता महत्त्व लक्षात आले, असे त्यांना सांगावे लागते, असेही ते म्हणाले.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात आदित्य प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी तसेच आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष शंकर अभ्यंकर आणि अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. याप्रसंगी ‘भारतीय उपासना’ या खंडाच्या तृतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. शंकर अभ्यंकर यांनी लिहिलेले कृतज्ञता पत्र, सरस्वती देवीचे मानचिन्ह आणि एक लाख रुपयांची गुरुदक्षिणा डॉ. मोहन भागवत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. जितेंद्र अभ्यंकर यांनी पत्राचे वाचन केले. आदित्य अभ्यंकर यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. भागवत म्हणाले, हिंदू समाजाचे शील आहे, वसुधैव कुटुंबकम्. 'परंपरेने मिळालेले अधिष्ठान हे शाश्वत सत्य आहे. सर्वांना मिळून चालायचे असेल तर धर्म आवश्यक आहे. सनातन धर्माचे उत्थान म्हणजे हिंदू राष्ट्राचे उत्थान आहे. संघ हा संकटातून टिकून इथवर आला ही स्तुती ठीक आहे. पण, त्याला इतकी वर्षे का लागली? असा प्रश्न विचारला जातो. शताब्दी वर्ष हा गौरवाचा तसेच आत्मपरीक्षणाचा विषय आहे, संपूर्ण समाज संघटित झाला तर राष्ट्र संपन्न होईल.
शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले, काही काळापूर्वी बहुमताचे आणि स्थिर सरकार मिळेल का?, अशी शंका होती. मात्र, भारतात संघाच्या साहाय्याने बहुमताचे सरकार आले आणि लोकशाही टिकून राहिली. पूर्वी 'यथा राजा, तथा प्रजा' असे म्हटले जायचे. आता 'यथा प्रजा, तथा राजा', असा काळ आहे.