लोणावळ्याजवळचे फार्म हाऊस म्हणजे धर्मेंद्र यांचे दुसरे घरच; मन:शांतीचे ठिकाण, ग्रामस्थांसोबत रंगत गप्पांचे फड
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 12:03 IST2025-11-25T12:02:32+5:302025-11-25T12:03:14+5:30
मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे

लोणावळ्याजवळचे फार्म हाऊस म्हणजे धर्मेंद्र यांचे दुसरे घरच; मन:शांतीचे ठिकाण, ग्रामस्थांसोबत रंगत गप्पांचे फड
लोणावळा : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ‘ही मॅन’ धर्मेंद्र अत्यंत संवेदनशील निसर्गप्रेमी होते. ग्लॅमरच्या प्रकाशझोतात आयुष्याचा मोठा काळ व्यतीत करूनही त्यांनी उत्तरार्धात निसर्गासोबत राहणे पसंत केले. लोणावळा शहरानजीक औंढे गावातील शंभर एकरांचे विस्तीर्ण फार्म हाउस मागील दोन दशकांपासून त्यांचे मन:शांतीचे आणि विरंगुळ्याचे ठिकाण बनले होते. हे फार्म हाउस त्यांचे दुसरे घरच बनले होते. त्यांच्या निधनाने हा परिसर सुनासुना झाला आहे.
लोणावळा बाजारपेठेपासून तीन किलोमीटरवरील मावळ तालुक्यातील औंढे गाव १९८५ पासून मोठ्या प्रमाणावर चर्चेला आले. कारण सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी औंढे गावातील शंभर एकर शेतजमीन विकत घेतली. १२ जून १९८५ रोजी हा व्यवहार झाला होता. येथे त्यांनी आलिशान फार्म हाउस बांधले आहे. पारंपरिक पंजाबी संस्कृती आणि आधुनिक सुखसोयी यांचा मिलाफ येथे आहे. घराचे डिझाइन ग्रामीण शैलीचे असून, थंड हवामानातही वापरता येणारा हिटेड स्विमिंग पूलही आहे. येथे त्यांनी सेंद्रिय शेतीचे विविध प्रयोग केले आहेत. त्यातील पालेभाज्या-फळभाज्या आणि फळे ते सर्वांना देत. दरवर्षी भाताचे पीकही घेत. येथे त्यांनी गायी-म्हशींसोबत, कुत्री, बदकेही पाळली आहेत. मुंबईतील धावपळीतून वेळ काढून ते येथे नेहमी येत. ग्रामस्थांसोबत तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील यांच्यासोबत धर्मेंद्र यांचे गप्पांचे फड रंगत. ते सर्वांना स्नेहभोजनही देत.
येथील माती, हिरवागार निसर्ग, जनावरे, पावसाचा सुगंध यात धर्मेंद्र हरवून जात. हातात नांगर घेऊन शेतात उभे राहणे, ट्रॅक्टर चालवणे, फळझाडांची निगा राखणे, कर्मचाऱ्यांबरोबर चहा घेत गप्पा मारणे, जनावरांना स्वतः हाताने चारा घालणे अशा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये त्यांना अपार आनंद सापडला होता.
सोशल मीडियावरही ते सक्रिय होते. या फार्महाउसवरील छायाचित्रे, व्हिडीओ ते नेहमी शेअर करत असत. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले; पण औंढे गावातील त्यांचा दररोजचा वावर, शेतातील खळखळून हसणे आणि त्यांच्या सोबतीने केलेली शेतातील कामे आम्ही विसरू शकत नाही, असे ग्रामस्थ सांगतात.
‘‘मी जाट आहे आणि जाटांचे गायी, गुरे आणि शेतीवर प्रेम असते. त्यामुळे माझा बहुतेक वेळ या फार्महाउसवर जातो. आम्ही मुद्दाम सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे’’, असे धर्मेंद्र यांच्या बोलण्यात नेहमी येत असे, अशी आठवण ग्रामस्थांनी सांगितली.
साधेपणा, मनमोकळा स्वभाव आणि हाक
‘धर्मेंद्रजींना येथे पाहिले की, आम्हाला हीरो नाही, तर आपल्या घरातला मोठा भाऊ भेटतोय, असे वाटायचे’, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. त्यांचा साधेपणा, मनमोकळा स्वभाव आणि प्रेमाने हाक मारण्याची विशिष्ट शैली अनेकांच्या मनात घर करून गेली होती.