स्वतःच्या शेतजमिनीत जाण्यास शेतकरी महिलेला मिळेना,'न्याय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:59 IST2024-12-07T16:59:31+5:302024-12-07T16:59:31+5:30
जमिन मोजणीसाठी तहसील कार्यालयासमोर करणार उपोषण

स्वतःच्या शेतजमिनीत जाण्यास शेतकरी महिलेला मिळेना,'न्याय'
शिरूर : तालुक्यातील सविंदणे येथील शेतकरी महिलेच्या स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीची सरकारी मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस बंदोबस्त असताना सात ते आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून हाकलून दिल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.२९) घडला. त्यांच्यावर ना भूमी अभिलेख कार्यालयाने कारवाई केली ना पोलिसांनी, यामुळे गेली काही वर्षांपासून स्वत:च्या जमिनीत जाण्यास अटकाव केला जात असल्याने त्रस्त शेतकरी महिलेने न्याय मिळेपर्यंत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मंदा तानाजी रोकडे (रा. सविंदणे, ता. शिरूर) असे पीडित शेतकरी महिलेचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या मालकीच्या जमिनीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय शिरूर येथे अर्ज केला होता. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी मोजणी मंजूर करण्यात आली होती. त्यावेळीही त्या जमिनिशी काहीही संबंध नसलेल्या काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे हरकत घेऊन वादविवाद केला. त्याच लोकांनी मंदा रोकडे यांच्या मालकीच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी स्थगिती द्यावी म्हणून उपअधीक्षक भूमी अभिलेख व घोडनदी न्यायालयात अर्ज केला. परंतु न्यायालयाने स्थगिती देण्यासाठीचा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर शुक्रवारी (दि.२९) रोजी मोजणी कर्मचारी पीयूष बगाडे, पोलिस कर्मचारी व अर्जदार शेतात मोजणी करण्यासाठी गेले असता. तेथे भिवा खुमाजी पडवळ, भक्तिराम शिवराम पडवळ, रतन दत्तात्रेय पडवळ यांसह त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी सरकारी मोजणी करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मोजणी करण्यापासून मज्जाव करण्यासाठी बेकायदेशीर जमाव जमवून अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही अरेरावी करण्यात आली. तरीही भूमी अभिलेख अधिकारी व पोलिस प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अर्जदार मंदा तानाजी रोकडे यांनी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
भूमी अभिलेखचा अजब कारभार
महिला शेतकरी रोकडे यांची स्वत:च्या मालकीची जमीन आहे. तर अडथळा करणाऱ्यांचा त्या जमिनीशी काडीमात्र संबंध नाही. ना त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यात त्यांचे नाव आहे, ना त्या गट नंबरमध्ये, ना त्यांची शेजारी जमीन आहे. ना ते त्या गावचे रहिवासी आहेत. असे असतानाही चिरीमिरीसाठी शिरूर भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी अडथळा करणाऱ्यांचा रोकडे यांच्या विरोधातील अर्ज स्वीकारून त्यावर कार्यवाही केली. असे होत राहिले तर कोणी कुठल्याही शेकऱ्याच्या जमिनीवर हरकत घेऊन शेतकऱ्यांना त्रास देऊ शकतात आणि शेतकऱ्यांना स्वत:ची जमीन कसता येणार नाही. असे शेतकरी संगत आहेत.