उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 10:54 IST2025-03-19T10:52:35+5:302025-03-19T10:54:04+5:30
गोंधळाचे वातावरण, काही ठिकाणी नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट वेळेत आल्या नाहीत. तर, काही सेंटर अचानक बंद झाली

उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील!
पुणे : उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एसएसआरपी) बसविण्यासाठी परिवहन विभागाकडून ३० एप्रिल २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. परंतु नंबर प्लेट बसविण्यासाठी अनेक वाहनधारकांना मे महिन्यातील तारीख देण्यात येत आहे. त्यामुळे उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसविण्यासाठीचा कालावधी नेमका किती दिवस आहे? असा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.
एप्रिल २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार पुण्यात वाहनांना नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. नंबर प्लेट लावण्याची मुदत ३० एप्रिल २०२५ देण्यात आली आहे. परंतु वाहनधारक नंबर प्लेट लावण्यासाठी नोंदणी करताना मे महिन्यामधील तारीख मिळत आहे. पुणे शहरात २६ लाख वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत दोन लाखांजवळ वाहनांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी नोंदणी केली आहे. नंबर प्लेट बसविण्याची गती संथ आहे. त्यामुळे आरटीओकडून रोझमार्ट फिटमेंट सेंटर वाढविण्याची सूचना केली आहे.
गोंधळाचे वातावरण
- काही ठिकाणी नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट वेळेत आल्या नाहीत. तर, काही सेंटर अचानक बंद झाली.
- काही ठिकाणी फिटमेंटवरून वादावादीचे प्रकार घडू लागले होते.
- ऑनलाइन बुकिंग करताना काही वेळा अडचणी येत होत्या. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
- ३० एप्रिलची मुदत जवळ आल्यामुळे बुकिंग वाढले आहे. दिवसाला सहा ते सात हजार बुकिंग होत आहे.
चार वर्षे लागणार
उच्च सुरक्षा नंबर प्लेटला मुदतवाढ दिलेली नसताना कंपन्यांकडून मात्र पुढच्या महिन्यातील तारीख देण्यात आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. कंपनीकडे वेगाने सुरक्षा नंबर प्लेट बसविण्याची यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे २६ लाख वाहनांचे नंबर प्लेट लावण्यासाठी चार वर्ष लागतील.
उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० एप्रिलची मुदत आहे. परंतु नंबर प्लेट लावण्यासाठी दैनंदिन कोटा पूर्ण झाल्याने पुढील महिन्यातील तारीख मिळत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी गोंधळून जाऊ नये शिवाय कंपनीला फिटमेंट सेंटर वाढविण्याचे आदेश दिले आहे. - स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी नाेंदणी केली असता अनेकांना मे आणि जून महिन्याची अपाॅइमेंट मिळाली आहे. नंबर प्लेट लावण्याची मुदत तर ३० एप्रिल आहे. मला तर जून महिन्याची तारीख मिळाली. नेमकं काय समजायचं? असा प्रश्न पडत आहे. - सागर पाटील, वाहनधारक