पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले

By विवेक भुसे | Updated: March 13, 2023 19:43 IST2023-03-13T19:43:00+5:302023-03-13T19:43:56+5:30

मुलीला मैदानी चाचणीसाठी सोडल्यानंतर चहा पिण्यासाठी बाहेर आले असता त्यांना कंटेनरने उडविले

The container blew up the father who had brought the daughter for police recruitment | पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले

पित्यावर काळाचा घाला! पोलीस भरतीसाठी लेकीला घेऊन आलेल्या वडिलांना कंटेनरने उडविले

पुणे: लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या पित्यावर काळाने घाला घातला. भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत पित्याचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश सखाराम गवळी (वय ५५, रा.रमाबाई आंबेडकरनगर नाशिक रोड नाशिक) असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या बाजूला हर्डीकर हॉस्पिटलसमोर सोमवारी (दि १३) पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी, शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात कंटेनर चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहितीनुसार, सुरेश गवळी हे मुळचे नाशिक येथील राहणारे होते. ते शेतीबरोबरच रिक्षा चालवून कुटूंबाचा उदर्निर्वाह करत होते. त्यांच्या मुलीची सोमवारी पहाटे पोलीस भरतीची मैदानी चाचणी होती. त्यासाठी ते रविवारी रात्रीच पत्नीसह पुण्यात आले होते. मुख्यालयाच्या परिसरातील पदपथावर त्यांनी रात्री मुक्काम केला. पहाटे मुलीची मैदानी चाचणी असल्यामुळे त्यांनी तिला मैदानावर सोडले. त्यानंतर ते चहा पिण्यासाठी बाहेर आले होते. तर त्यांची पत्नी मुख्यालयाच्या परिसरातच थांबली होती. हर्डीकर रुग्णालयासमोर रस्ता ओलांडत असताना, वेगाने जाणाऱ्या कंटेनरने गवळी यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलिस कंटनेर चालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: The container blew up the father who had brought the daughter for police recruitment