साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक; शेतकरीही संकटात, शरद पवारांचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 18:05 IST2025-03-15T18:04:30+5:302025-03-15T18:05:13+5:30
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, ही स्थिती चांगली नाही

साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक; शेतकरीही संकटात, शरद पवारांचा सरकारवर निशाणा
बारामती: महाराष्ट्र मध्ये पुन्हा आत्महत्या वाढल्या आहेत. ही स्थिती चांगली नाही, साखर उद्योगाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ही परिस्थिती सुधारण्याची क्षमता ज्यांच्याकडे आहे, त्यांचं मात्र याकडे किती लक्ष आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. ही स्थिती चांगली नाही, शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला.
बारामती येथे एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि ‘विस्मा’ यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस उत्पादनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी प्रयोग या विषयावर आयोजित ऊस परिषदेत पवार बोलत होते.यावेळी पवार पुढे म्हणाले, राज्यात ‘एआय’ तंत्रज्ञान चमत्कार करू शकते. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. सर्व संस्थानी एकत्र बसून राज्यभर एक कार्यक्रम घेण्याची पावलं टाकल्यास ४ ते ४ वर्षात राज्यात ऊस उत्पादनात क्रांती होईल. ऊसाप्रमाणे इतर पिकात देखील ‘एआय’ शेती अर्थव्यवस`था बदलेल. परिणामी देशाची राज्याची अर्थव्यवस्था बदलायला यातून मदत होईल. देशामध्ये साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी या उद्योगाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये सध्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. शेती क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेती उत्पादनात वाढ होत आहे. यामध्ये ऊस उत्पादनात आर्टिफिशियल ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस उत्पादन वाढीचा प्रयोग बारामती कृषी विज्ञान केंद्रात यशस्वी झाला आहे ही कौतुकास्पद बाब असल्याचे पवार म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडविणाऱ्या तंत्रज्ञानावर ‘केव्हीके’ चा पुढकार अभिमानास्पद आहे. शेतकऱ्यांचे ठीबक सिंचनाने थकीत ५०० कोटींचे अनुदान वेळेवर मिळणे आवश्यक असल्याचे सुळे यांनी नमुद केले. यावेळी ‘बिस्मा’चे अध्यक्ष बी.बी ठोंबरे यांनी ऊस विकासाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली. तंत्रज्ञान वापराचे नियोजन केल्यास साखर उद्योगाचे चित्र बदलण्याची खात्री असल्याचे ठोंबरे म्हणाले. यावेळी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी ‘एआय’चा ‘केव्हीके’ मध्ये सुरु असलेल्या प्रयोगाचा आढावा घेत एआय तंत्रज्ञानाचे कृषि क्षेत्रातील महत्व विषद केले. मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे यांनी या तंत्रज्ञान वापराचे ‘प्रेझेंटेशन’ सादर केले.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी ऊस उत्पादनामध्ये ए आय तंत्रज्ञान महत्वपूर्ण ठरेल. हे काम बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून होत आहे. याचा आपणास सार्थ अभिमान असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. "विस्मा" चे अध्यक्ष बी. ठोंबरे यांनी आपल्या भाषणात साखर उद्योगापुढील अडचणी सांगत ए.आय तंत्रज्ञान ऊस उत्पादकांना फायदेशीर ठरणारे असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रीय साखर संघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.