Tharoor Nama for Congress Workers | काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "थरूर" नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी "थरूर" नामा : ३७० कलमासह, झुंडशाही, हिंदुत्व, अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र

ठळक मुद्देसोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वाससभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय

पुणे : निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार शशी थरूर यांनी ३७० कलमासह झुंडशाही, हिंदुत्व, हिंदी भाषा अशा विविध मुद्यांवरून भाजपावर टीकास्त्र सोडले. तर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही खडे बोल सुनावले. त्यांच्या भाषणाची शैली व आक्रमकता काँग्रेस भवनमधील तरूण कार्यकर्त्यांसह नेत्यांनाही भावली. कार्यकर्त्यांसाठी हे भाषण आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जणू चैतन्य देणारे ठरले. 
काँग्रेस भवनमध्ये रविवारी शशी थरूर यांनी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील तरूण व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सभागृहामध्ये तरूणांची उपस्थिती लक्षणीय होती. त्यामुळे त्यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच राजकारणापासून दुर राहणाऱ्या तरूणांना उद्देशून केली. अनेक व्यावसायिक तरूण राजकारणात आल्यास त्यांचे विचार, नवनवीन कल्पना शासनापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी राजकारणात या, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर मात्र त्यांनी केंद्र सरकार व भाजपाच्या नीतीवर चौफेर टीका केली. भाजपाकडून महात्मा गांधी व सरदार पटेल यांचे विचार सोयीनुसार हायजॅक केले जात आहेत. स्वातंत्र्यानंतर पटेलांनाही गांधीवाद हाच खरा राष्ट्रवाद असल्याचे पटले होते. पण भाजपाकडून काही गोष्टी जाणीवपुर्वक लपविल्या जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काश्मीरमधून हटविण्यात आलेले कलम ३७०, हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात मुस्लिम तरूणांच्या होत असलेल्या हत्या, श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती, हिंदी भाषेबाबत अमित शहा यांची भुमिका अशा विविध मुद्यांना स्पर्श केला. हिंदु धर्म व श्रीरामाचाही अपमान करणारे असले हिंदुत्व आपल्याला मान्य नसल्याचे परखड मत यांनी मांडले. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या मताला सकारात्मक प्रतिसाद दिला. 
भाजपावर टीका करताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना पक्षांतर करणाऱ्या नेत्यांनाही धारेवर धरले. काँग्रेसच्या तत्वांना तिलांजली देणाऱ्या संधीसाधू नेत्यांनी खुशाल जावे. पक्षासोबत राहणारेच महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणुकांना सामोरे जावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मुद्दा प्रखरपणे मांडत त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याविषयी कसबा ब्लॉक अध्यक्ष सचिन आडेकर म्हणाले, थरूर यांचे विचार तरूणाईला नेहमीच आकर्षित करतात. भाषणातून त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत. हे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी सर्व प्रमुख शहरांमध्ये त्यांची भाषणे व्हायला हवीत. पक्ष संघटनेला दिशा, चैतन्य देणाऱ्या अशा नेत्याची गरज आहे.   
............
महात्मा गांधी व पंडित नेहरू यांचे विचारच देशाला तारू शकतात, हे थरूर यांनी पटवून दिले. भाजपाकडून सरदार पटेल आणि काँग्रेसविषयी केली जात असलेली चुकीची मांडणीही त्यांनी खोडून काढली. तरूणांना ही भुमिका पटल्याचे त्यांच्या प्रतिसादावरून दिसून आले. त्यांचे भाषण कार्यकर्त्यांना चेतना देणारे ठरले. 
- रमेश बागवे, शहराध्यक्ष, काँग्रेस
----------------
शशी थरूर यांचे भाषण कार्यकर्त्यांना दिशा देणारे ठरले. विकासाचे मुद्दे घेऊन भाजपा निवडणुकीला सामोरे जात नाही. भावनिक वातावरण निर्माण केले जात आहे. ३७० कलमाचा निवडणुकीशी संबंध नाही. पण अमित शहा मुंबईत व्याख्यान देतात. त्याला उत्तर देण्याचे काम थरूर यांनी केले आहे. 
- मोहन जोशी, ज्येष्ठ नेते

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Tharoor Nama for Congress Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.