पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:52 IST2025-01-24T09:52:22+5:302025-01-24T09:52:30+5:30
तेथील दुकानदार व दहा पंधरा नागरिकांनी एकत्र येत हिम्मत दाखवून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले

पुण्यातील बी. टी. कवडे रस्त्यावर कोयत्याचा धाक दाखवत दहशत; वीस वाहनांची तोडफोड
वानवडी : वर्दळीच्या वेळी दोन युवकांनी कोयत्याचा धाक दाखवत वीस वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास बी. टी. कवडे रस्त्यावर घडली. या घटनेत मुंढवापोलिसांनी कौशल लांडगे (वय २०, रा. भीमनगर) यासह एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे.
दोन मुले हातात कोयता घेऊन ससाणे उद्यान ते बी. टी. कवडे रस्त्यावरून जाताना दिसले. ते वाहनांची तोडफोड करत होते. तेथून ते एका गाडीवर कोयत्याने वार करून हॉटेलमध्ये शिरले व टेबलावर कोयता मारत दहशत निर्माण करून नुकसान केले. बसेरा कॉलनीत या कोयता धारी युवकांनी रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या.
परिसरात दहशत निर्माण व्हावी या हेतूने दोन युवकांनी कोयत्याच्या सहाय्याने बी. टी. कवडे रस्त्यावरील वीसपेक्षा जास्त वाहनांची तोडफोड केल्याचे समजते. यामध्ये प्रामुख्याने चारचाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. वाहने फोडताना काही नागरिकांनी अडवले असता त्यांना सुद्धा कोयता दाखवत धमकी देत तेथून पळ काढला व निगडे नगर येथे रिक्षात लपून बसले. तेथील दुकानदार व दहा पंधरा नागरिकांनी एकत्र येत हिम्मत दाखवून त्यांना पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले.
आरोपीने नशा केली होती. त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले असून त्यांना ताब्यात घेतले आहे. - नीलकंठ जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे