बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 12:28 IST2025-01-26T12:26:29+5:302025-01-26T12:28:29+5:30
पार्टी करून परतताना वडगाव पुलाजवळ भीषण अपघात

बर्थ डे पार्टीवरून परतताना काळाचा घाला! कार बसवर आदळून एकाचा मृत्यू, पाच जखमी…
धायरी : सातारा दिशेकडून मुंबईकडे जाणाऱ्या बाह्यवळण महामार्गावरील वडगाव बुद्रुक पुलाजवळ रस्त्यात उभ्या असलेल्या बसला पाठीमागून आलेल्या स्विफ्ट कारने जोरात धडक दिली. पहाटे पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, पाचजण जखमी झाले आहेत.
स्मीत समीर पवार (वय १९, रा. आई बंगला, मोरया पार्क, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोहम आलीश खळे (१९, रा. कॅफेल वर्ल्ड, डी पी रोड, औंध), प्रतीक दीपक बंडगर (१९, रा. गांगुर्डेनगर, पिंपळे गुरव), मकरंद ऊर्फ अथर्व हंबीरराव जेडगे (१९, रा. कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली), आयुष आंबिदास काटे (२०, रा. सिद्धी टॉवर, दापोडी), हर्ष नितीन वरे (रा. पिंपळे गुरव) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याबाबत पोलिस अंमलदार दत्तात्रय पंढरीनाथ राख यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आयशर मिनी बसचालक चंद्रशेखर बाबासो सुरवसे (वय ४३, रा. अभिनव कॉलेजसमोर, दैवत बिल्डिंग, नर्हे, मूळ रा. आंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, साताराहून मुंबईकडे जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावरील वडगाव पुलाच्या सुरुवातीला चंद्रशेखर सुरवसे याने सचिन ट्रॅव्हल्सची मिनी बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती. पहाटेच्या सुमारास पिंपरी चिंचवडच्या दिशेला जाणाऱ्या स्विफ्ट कारचालकाला रस्त्यात उभी असलेली ही मिनी बस दिसली नाही. त्याने उजवीकडून कार पुढे काढण्याच्या प्रयत्नात वेगाने मिनी बसला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कारची पुढील बाजू पूर्णपणे आत गेली होती. कारमध्ये पुढे बसलेले अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाच्या पोलिसांनी अपघातग्रस्त कार बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, अपघाताचे वृत्त समजताच पोलिस उपायुक्त
अमोल झेंडे, संभाजी कदम, सहायक पोलिस आयुक्त भाऊसाहेब पठारे, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरीक्षक समीर चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, अक्षय पाटील यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.
बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेले होते तरुण...
हर्ष वरे या तरुणाचा शनिवारी वाढदिवस असल्याने त्याच्यासह इतर पाच मित्र एका कारमधून सिंहगड किल्ल्याच्या दिशेला गेले होते. रात्री बारा वाजल्यानंतर त्यांनी बर्थडे सेलिब्रेशन केले. त्यानंतर ते पहाटेच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असता वडगाव पुलावर हा अपघात घडला. यात ‘बर्थडे बॉय’ हर्ष वरे याच्यासह इतर चारजण गंभीर जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे.