'मन मोकळं करून सांगण्याची प्रवृत्ती’, मानसिक आधारासाठी तरुण घेताहेत एआयची मदत, पुरुषांचे प्रमाण अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:10 IST2025-11-17T17:09:27+5:302025-11-17T17:10:03+5:30
मानसिक आधारासाठी मदत मागणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष, तर ३५ टक्के महिला आहेत

'मन मोकळं करून सांगण्याची प्रवृत्ती’, मानसिक आधारासाठी तरुण घेताहेत एआयची मदत, पुरुषांचे प्रमाण अधिक
पुणे: तरुणांमध्ये मानसिक ताणतणाव, भावनिक गोंधळ आणि असुरक्षिततेच्या स्थितीत मदत मिळवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्मचा वापर झपाट्याने वाढत आहे. पुण्यातील ‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या मानसिक आरोग्य व आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थेच्या हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात मिळालेल्या सुमारे ९ हजार फोन कॉल्सपैकी तब्बल ९०० कॉल्स एआय प्लॅटफॉर्म्सकडून सुचविण्यात आल्याचे समोर आले आहे. तरुणांनी ‘एआयला मन मोकळं करून सांगण्याची’ प्रवृत्ती वाढत असल्याचेही संस्थेने नमूद केले आहे.
हेल्पलाइन प्रोग्राम कोऑर्डिनेटर विक्रम पवार यांनी सांगितले की, चॅटजीपीटीसह अनेक एआय प्लॅटफॉर्म तरुणांचे बोलणे ऐकतात, त्यांच्या भावनिक स्थितीचा अंदाज घेतात आणि आत्महत्येसारखी लक्षणे दिसल्यास हेल्पलाइनशी त्वरित संपर्क साधण्याचा सल्ला देतात. भावनिक मान्यता, ऐकून घेणे आणि सोपी कृतीशील दिशा देणे. या गुणांमुळे तरुण एआयशी अधिक मोकळेपणाने बोलतात, असे ते म्हणाले. महाराष्ट्राबरोबरच आसाम, मेघालय, कोलकाता, जमशेदपूर आणि बिहारमधूनही अशेच एआय-रेफरल कॉल्स येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा अधिक
कनेक्टिंग ट्रस्टच्या २० वर्षांच्या आकडेवारीनुसार मानसिक आधारासाठी मदत मागणाऱ्यांमध्ये ६५ टक्के पुरुष, तर ३५ टक्के महिला आहेत. पुरुषांना समस्यांबद्दल बोलताना ‘कमजोरी वाटते’ अशी सामाजिक अढी असल्याने ते भावनिक ताण दाबून ठेवतात आणि त्यामुळे व्यसनाकडे वळण्याचा धोका वाढतो, असे संस्थेने नमूद केले आहे. ओळख न विचारल्याने पुरुष हेल्पलाइनवर अधिक मोकळेपणाने समस्या मांडतात.
आत्महत्येची कारणे वरवर दिसणाऱ्या प्रसंगांशी ब्रेकअप, कमी गुण, वाद जोडले जातात ; परंतु प्रत्यक्षात त्या मागे दीर्घकाळ साचलेली वेदना, सामाजिक तणाव आणि एकाकीपणा दडलेला असतो. या पार्श्वभूमीवर, २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पुण्यात ‘आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्यावर नवीन दृष्टिकोन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देश-विदेशातील तज्ज्ञ यात सहभागी होणार आहेत. - सॅंडी अँड्रेड, संस्थेच्या सह-व्यवस्थापकीय ट्रस्टी.
देशातील एकूण आत्महत्यांचे प्रमाण कमी होत असले तरी १८–३० वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण, विशेषतः नीट सारख्या स्पर्धा परीक्षांचा दडपण, हे या वाढीमागील प्रमुख कारण आहे. भावनिक ट्रिगर्स ओळखणे, पीअर एज्युकेटर प्रोग्राम आणि पालक-शिक्षकांसाठी कार्यशाळा हे संस्थेचे महत्त्वाचे उपक्रम आहेत. - लॉरेन डेविड, मानसशास्त्रज्ञ, कनेक्टिंग ट्रस्ट.
आम्ही सल्ला देत नाही; शांतपणे ऐकतो, समजून घेतो. यामुळे व्यक्तीच्या भावनांचा निचरा होतो आणि मानसिक ताण हलका होतो. गेल्या दोन दशकांत कनेक्टिंग ट्रस्टने १.५ लाखांहून अधिक व्यक्तींना मानसिक आधार दिला आहे. तरुणांकडून वाढत चाललेला एआयचा वापर मानसिक आरोग्य क्षेत्रात नवीन आणि महत्त्वाचा कल ठरत आहे. - विरन राजपूत, वरिष्ठ स्वयंसेवक, कनेक्टिंग ट्रस्ट.