टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 14:59 IST2023-04-09T14:59:39+5:302023-04-09T14:59:48+5:30

रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पो चालकाबरोबर भांडण झाले

Tempe driver hits Bukki in chest The rickshaw driver died on the spot | टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू

टेम्पाे चालकाने मारली छातीत बुक्की; रिक्षा चालकाचा जागेवरच मृत्यू

पुणे : रिक्षा रस्त्यावर लावल्याने रस्ता ओलांडण्यास जागा नसल्यामुळे टेम्पो चालकाबरोबर भांडण झाले. त्यात टेम्पो चालकाने छातीत बुक्की मारल्याने एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. जैनुद्दीन मोहम्मद नदाफ (वय ४८, रा. कलवड वस्ती, लोहगाव), असे मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. विमानतळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून टेम्पो चालक अमोल नारायण सूर्यवंशी (वय २७, रा. वाघोली) याला अटक केली आहे.

याबाबत बशीर मोहम्मद नदाफ (वय ३६, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ‘आपले घर सोसायटी’जवळील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता घडला.

फिर्यादी यांचा भाऊ जैनुद्दीन नदाफ हा रिक्षा चालक असून, तो त्यांचा मित्र मतीन बागवान व पुतण्या सुलतान नदाफ हे ‘आपले घर साेसायटी’जवळ रस्त्याच्या कडेला रिक्षा लावून गप्पा मारत बसलेले होते. त्यावेळी विरुद्ध बाजूने आलेल्या टेम्पोला रस्ता क्रॉस करून जाण्यास जागा नसल्याने त्यांच्यात वाद झाला. यावेळी टेम्पो चालक अमोल सूर्यवंशी याने शिवीगाळ करून जैनुद्दीन याच्या छातीत जोरात बुक्की मारली. त्यामुळे जैनुद्दीन हा जागीच कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेले; परंतु तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घाेषित केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून टेम्पो चालक सूर्यवंशी याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक माळी तपास करीत आहेत.

Web Title: Tempe driver hits Bukki in chest The rickshaw driver died on the spot