मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:00 IST2025-11-11T11:59:50+5:302025-11-11T12:00:55+5:30
मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले

मुंढवा आणि बोपोडी गैरव्यवहार प्रकरणात तहसीलदारच दोषी; अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता
पुणे: बोपोडी येथील जमीन गैरव्यवहारासंदर्भातील गुन्हा खडक पोलिस ठाण्याकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे शुक्रवारी वर्ग करण्यात आला असून तपासासाठी पोलिसांनी महसुली अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला आहे. महसूल विभागाकडून आर्थिक गुन्हे शाखेला आवश्यक असलेली कागदपत्रे मिळाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास वेगाने होण्यास मदत होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच, मुंढवा येथील जमीन व्यवहारात आरोपी करण्यात आलेल्या पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा बोपोडीतील प्रकरणात संबंध नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी (दि. १०) स्पष्ट केले. त्याचबरोबर दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी असलेल्या तहसीलदार सूर्यकांत येवले याचे अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
बोपोडी येथील जमीन व्यवहाराची नोंदणी गुरूवार पेठेळील हवेली तहसीलदार कचेरीत करण्यात आली आहे. त्यामुळे, त्यासंदर्भात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसीलदार येवले याने संगनमत करून हा व्यवहार करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याबाबत शासकीय चौकशीची प्रक्रिया पार पडल्यानंतर तहसीलदार येवले याला निलंबित करण्यात आले आहे. जमिनीचा अपहार करुन बेकायदा आदेश आणि पत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येवले याच्यासह खडक पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याप्रकरणी व्हिजन प्रॉपर्टीतर्फे कुलमुखत्यारधारक राजेंद्र रामचंद्र विध्वंस (रा. इंद्रा मेमरीज, सकाळनगर, बाणेर रस्ता), ऋषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विद्यानंद अविनाश पुराणिक (रा. इंदूर ,मध्य प्रदेश), जयश्री संजय एकबोटे (रा. चित्रलेखा बिल्डिंग, कुलाबा, मुंबई), हेमंत गवंडे (रा. सकाळनगर, बाणेर रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात नायब तहसीलदार प्रवीणा शशिकांत बोर्डे यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपयुक्त विवेक मासाळ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचे क्लिष्ट स्वरूप लक्षात घेता संबंधित जमिनीची सर्व जुनी कागदपत्रे, सातबारा उतारे, त्यावरील बदलत गेलेल्या नोंदी आणि तत्सम अनेक कागदपत्रांची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने शुक्रवारीच (दि. ७) जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, मुद्रांक शुल्क कार्यालय आणि अन्य महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन आवश्यक कागदपत्रांच्या मागणीचे पत्र सादर केले. ही कागदपत्रे मिळाल्यानंतर गुन्ह्याच्या तपासाला वेग येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.