ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:54 IST2025-10-10T15:51:49+5:302025-10-10T15:54:04+5:30
शिक्षक दुहेरी संकटात सापडले असून, अध्यापनासाठी आवश्यक वेळ आणि उत्साह कमी होत आहे.

ऑनलाइन कामांमुळे शिक्षक हैराण; मात्र शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा..!
जेजुरी : जेजुरी येथील प्राथमिक शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा वाढता बोजा आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या इशाऱ्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रोज येणाऱ्या लिंक्स, एक्सेल शीट्स आणि फॉर्म भरण्याच्या सूचनांमुळे आधीच त्रस्त असलेल्या शिक्षकांवर आता शिस्तभंगाची कारवाईचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे शिक्षक दुहेरी संकटात सापडले असून, अध्यापनासाठी आवश्यक वेळ आणि उत्साह कमी होत आहे.
विद्यार्थी सुरक्षा, निपुण महाराष्ट्र मूल्यांकन, स्वच्छ व हरित विद्यालय, ‘एक पेड माँ’, ‘विकसित भारत अभियान’, आधार बँक लिंकिंग अशा विविध उपक्रमांची माहिती दररोज मागवली जाते. सकाळी लिंक्स भरणे, दुपारी माहिती अपलोड करणे आणि संध्याकाळी अहवाल पाठवणे यातच शिक्षकांचा वेळ खर्च होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची आणि अध्यापनाची गुणवत्ता राखण्याची संधी कमी होत आहे.
पुणे जिल्ह्यातील शैक्षणिक कामकाज वेळेवर पूर्ण न झाल्याने शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरून शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तांत्रिक अडचणी, इंटरनेट समस्या आणि मनुष्यबळाची कमतरता यामुळे शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरीही प्रशासनाच्या कारवाईच्या धमकीमुळे शिक्षकांना अध्यापन सोडून ऑनलाइन कामांना प्राधान्य द्यावे लागत आहे.
“निपुण चाचण्या, विविध अॅप्स डाउनलोड करणे आणि अहवाल पाठवणे यामुळे शिक्षकांचा अध्यापनाकडे असलेला वेळ आणि उत्साह कमी होत आहे,” असे एका मुख्याध्यापकाने सांगितले. शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी शिक्षकांना मोकळे वातावरण मिळाले पाहिजे. यासाठी प्रत्येक शाळेत स्वतंत्र डेटा ऑपरेटर आणि लिपिक नेमण्याची गरज आहे,” अशी मागणी त्यांनी केली.
उपाययोजनांची गरज
प्रशासकीय कामे महत्त्वाची असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होता कामा नये. शिक्षकांवरील प्रशासकीय बोजा कमी करून त्यांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करण्याची संधी देण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांच्या या समस्येकडे लक्ष देऊन प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.