पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 16:47 IST2026-03-31T16:46:42+5:302026-03-31T16:47:48+5:30
पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली होती, याचा अर्थ मुक्काम बदलला असे होत नाही

पुण्यातील भवानी पेठेतील पालखी मुक्काम हलवल्याची चर्चा केवळ अफवा; संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचा मोठा खुलासा
आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यातील पुण्याच्या मुक्कामाबाबत सध्या सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर देवस्थान संस्थानने स्पष्टीकरण दिले आहे. भवानी पेठेतील मुक्काम हलवलेला नाही आणि पुण्यातील एक दिवसाचा मुक्काम कमी केल्याचा निर्णयही झालेला नाही, असे संस्थानच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून भाविक आणि वारकरी बांधवांनी कोणत्याही संभ्रमात पडू नये असा खुलासा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने केला आहे.
या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पालखी सोहळा प्रमुख ऍड. राजेंद्र उमाप यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली होती. सदरची चर्चा भाविकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी उत्तम पर्याय शोधण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. सध्याच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेनुसार माउलींचा मुक्काम भवानी पेठ येथील श्री पालखी विठोबा मंदिरातच दर्शवण्यात आला आहे. काही दिंडी प्रतिनिधींनी सासवडला पोहोचण्यास होणारा उशीर टाळण्यासाठी 'वडकी' येथील मुक्कामाचा पर्याय सुचवला असला, तरी त्यावर कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. जागा अपुरी असल्याने भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, ही विश्वस्तांची भूमिका आहे, मात्र याचा अर्थ मुक्काम बदलला असा होत नाही.
जागेच्या उपलब्धतेबाबत आणि पर्यायी व्यवस्थेबाबत लवकरच जिल्हाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक होणार होती, मात्र मार्च अखेरच्या कामांमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासनाकडून मिळणारा अहवाल आणि वारकरी समाजाच्या सूचनांचा विचार करूनच पुढील पाऊल उचलले जाईल. घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, याची ग्वाही संस्थानने दिली आहे. याप्रसंगी प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार - आरफळकर, विश्वस्त योगी निरंजनाथ, चैतन्य महाराज लोंढे - कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, ऍड. रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आदी उपस्थित होते.
दरवर्षी सासवड येथे पोहोचण्यास रात्रीचे १० वाजतात. हा उशीर टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिर येथील जागा भाविकांच्या वाढत्या संख्येनुसार अपुरी पडत आहे. दर्शनबारीमुळे रस्ते पूर्णपणे तुंबतात आणि पावसाचे दिवस असल्याने महिला व बालकांची गैरसोय होते. यावर पर्याय म्हणून इतर उपलब्ध जागांचा विचार मांडण्यात आला होता.
१३ एप्रिलला अंतिम निर्णय
पालखी सोहळ्याचे नियोजन हे सर्वांच्या सहभागातून केले जाते. त्यामुळे वारकरी प्रतिनिधी, दिंडी मालक, फडकरी आणि प्रशासन या सर्वांना विश्वासात घेऊनच १३ एप्रिल रोजी आळंदीत होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा दिशाभूल करणारे वातावरण निर्माण करू नये, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. माउलींच्या लाखो वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, हाच संस्थानचा मुख्य उद्देश असून सर्व निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतले जातील, असेही यावेळी सांगण्यात आले.