स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:32 IST2025-01-21T11:31:37+5:302025-01-21T11:32:38+5:30
शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेदेखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोसोबत समन्वय ठेवून एकत्रितरीत्या नियोजन करून निर्माण केले जाईल

स्वारगेट मेट्रो स्टेशन अन् बसस्थानक एकमेकांना जोडणार; प्रवाशांना होणार फायदा
पुणे: स्वारगेट येथे ‘मल्टीमाॅडेल ट्रान्सपोर्ट’ हब उभारण्यात येत आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशन व एसटी स्थानक एकमेकांना जोडल्यास त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे स्वारगेट एसटी स्थानक आणि मेट्रो स्टेशन जोडण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव पुणे मेट्रोने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) द्यावा, अशा सूचना परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सोमवारी दिल्या.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, परिवहन महामंडळ आणि पुणे मेट्रो याबाबत नव्याने करार करण्यात येत आहे. शिवाय शिवाजीनगर मेट्रो स्टेशन येथेदेखील शिवाजीनगर एसटी स्थानक मेट्रोसोबत समन्वय ठेवून एकत्रितरीत्या नियोजन करून निर्माण केले जाईल. पुढील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एकत्रित बैठक होणार आहे. त्यामध्ये या गोष्टींवर निर्णय घेतला जाईल. राज्यात एसटीबसची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
करार पूर्ण झाल्यावर काम सुरू होणार
शिवाजीनगर बसस्थानकाचे काम महामेट्रोकडून करण्यात आले आहे. त्याठिकाणी बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, यानुसार व्यावसायिक इमारतदेखील उभारली जाणार आहे. याबाबत महामेट्रो आणि एमएसआरटीसी यांच्यात करार होणार आहे. त्यासाठी महामेट्रोने कराराचा मसुदा तयार केला असून, तो एमएसआरटीसीला पाठविला आहे. हा करार पूर्ण झाल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.