पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ
By राजू हिंगे | Updated: February 26, 2025 16:54 IST2025-02-26T16:53:31+5:302025-02-26T16:54:56+5:30
लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत असून सरकार बेफिकीर असल्याने महिला सुरक्षित नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ
पुणे : राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले , मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. दिल्लीत ११ वर्षापूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाल्याने समाजातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर मोठे जनआंदोलन झाले होते. पुण्याची घटना ही तितकीच गंभीर आहे. सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सपकाळ यांनी सांगितले.