कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
By विश्वास मोरे | Updated: June 15, 2025 18:49 IST2025-06-15T18:47:52+5:302025-06-15T18:49:42+5:30
सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
मावळ ( पिंपरी चिंचवड) - मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी स्थानिक नागरिक, पोलिस व आपदा बचाव पथकाकडून संपूर्ण घटनेची माहिती घेतली.
सुळे यांनी जखमी नागरिकांना धीर दिला, त्यांच्याशी सुसंवाद साधला. ज्यांचे नातेवाईक अद्याप बेपत्ता आहेत अशा कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. “या ठिकाणी किती पर्यटक होते, कोणते लोक जखमी झाले आहेत आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधा, त्यांना तातडीने मदत पोहोचवा,” असे निर्देश सुळे यांनी प्रशासनाला दिले. या अपघातानंतर अनेक कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. बेपत्ता पर्यटकांच्या नातेवाईकांची घालमेल वाढली असून, त्यांच्याशी सुळे यांनी थेट संवाद साधत धीर दिला.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते…
— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2025
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया दिली. “आज बोलण्याचा दिवस नाही, तर जखमींना मदत मिळावी, अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अधिकृत मृत आणि जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासन व स्थानिक यंत्रणांनी कंबर कसली असून, दुर्घटनाग्रस्त पर्यटकांचे जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.