उन्हाळ्याची चाहूल अन् राज्यात पावसाचे सावट, पुढील ३ दिवसांमध्ये पावसाची शक्यता
By श्रीकिशन काळे | Updated: February 29, 2024 16:19 IST2024-02-29T16:18:50+5:302024-02-29T16:19:11+5:30
खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात १ मार्चला पावसाचा अंदाज

उन्हाळ्याची चाहूल अन् राज्यात पावसाचे सावट, पुढील ३ दिवसांमध्ये पावसाची शक्यता
पुणे : राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही ठिकाणी यलो अलर्टही दिला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील, असेही हवामान विभागाने अंदाज दिला आहे. पुण्यात मात्र किमान तापमान वाढल्याने उकाडा जाणवत आहे.
राज्यामधील छत्रपती संभाजीनगर, नगर, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी कोसळतील. तर पुणे, सांगली, सातारा, जालना, ठाणे, रायगड, नंदूरबार जिल्ह्यात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धाराशिव, बीड, सोलापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील.
शनिवारी (दि.१ मार्च) विदर्भातील वाशीम, नागपूर, चंद्रपूर, बुलडाणा, अकोला, अमरवती, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे, तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा ५ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात २९ फेब्रुवारीला तसेच खान्देश, नाशिकपासून कोल्हापूर सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात १ मार्चला पावसाचा अंदाज आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचीही शक्यताही जाणवते. - माणिकराव खुळे, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ