पुणे विभागात २५० किमी लोहमार्गावर ‘कवच’ची यशस्वी चाचणी; या प्रणालीचा नेमका उद्देश काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:41 IST2026-02-12T10:41:38+5:302026-02-12T10:41:50+5:30
पुणे विभागात पहिल्या टप्प्यात पुणे-कोल्हापूर आणि दौंड-मनमाड या मार्गांवर ‘कवच’च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

पुणे विभागात २५० किमी लोहमार्गावर ‘कवच’ची यशस्वी चाचणी; या प्रणालीचा नेमका उद्देश काय?
पुणे: मध्य रेल्वेच्यापुणे विभागाने देशात विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली ‘कवच’च्या बसविण्यात सुरुवात केली आहे. विभागातील सुमारे ७०० किलोमीटर रेल्वेमार्गापैकी २५० किलोमीटरवर नॉन-सिग्नलिंग कवच चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. येत्या काही महिन्यांत उर्वरित मार्गांवरही टप्प्याटप्प्याने चाचण्या घेऊन ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.
रेल्वे बोर्डाने रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणणे आणि प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करणे या उद्देशाने ‘कवच’ प्रणाली देशभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अत्याधुनिक स्वदेशी तंत्रज्ञान समोरासमोर होणाऱ्या गाड्यांच्या टक्कर टाळणे, लाल सिग्नल ओलांडण्याच्या घटना रोखणे, वेगमर्यादा उल्लंघन रोखणे आणि मानवी चुका कमी करणे यासाठी कार्यरत आहे. पुणे विभागात पहिल्या टप्प्यात पुणे-कोल्हापूर आणि दौंड-मनमाड या मार्गांवर ‘कवच’च्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तसेच टप्पा-२ अंतर्गत पाडेगाव, बेलापूर आणि राहुरी या स्थानकांवर प्रणालीची स्थापना पूर्ण झाली असून, दौंड-येवला विभागात स्थापनेचे काम वेगाने सुरू आहे. दूरसंचार पायाभूत सुविधांसाठी नियोजित १२३ टॉवरपैकी ५३ कवच टॉवर उभारण्यात आले आहेत. ‘कवच’च्या अंमलबजावणीमुळे पुणे विभागातील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली बसवण्याचे कामही तातडीने हाती घेण्यात आले. पुणे येथील डिझेल व इलेक्ट्रिक लोको शेडमध्ये हे काम गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरू करून अवघ्या १८ दिवसांत पूर्ण करण्यात आले. या कालावधीत वॅप-७ प्रकारातील चार लोकोमोटिव्हमध्ये कवच प्रणाली बसवून आवश्यक तपासणीनंतर मार्गावर सोडण्यात येत आहे. तसेच ‘कर्नेक्स’ संस्थेच्या समन्वयाने उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करत हे काम प्रथमच शेडमध्ये पूर्ण करण्यात आले.
कवचची प्रमुख वैशिष्ट्ये
- लाल सिग्नल ओलांडण्याच्या घटनांमध्ये घट होणार
- अपघात टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग व्यवस्था
- अतिवेग झाल्यास आपोआप ब्रेक लावण्याची सुविधा
- लोको केबिनमध्ये सिग्नल स्थिती व हालचालीचा अधिकार दर्शविणारी माहिती
- धुक्याच्या परिस्थितीत सुरक्षित संचालनास मदत
- लेव्हल क्रॉसिंगजवळ पोहोचताना स्वयंचलित हॉर्न
- नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिमद्वारे रिअल-टाइम केंद्रीकृत निरीक्षण
कवच प्रणालीमुळे रेल्वेचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. पहिल्या टप्प्यात २५० किमी मार्गावर प्रणाली बसवण्यात आले आहे. उर्वरित मार्गावरील काम वेगाने सुरू आहे. या यंत्रणेमुळे अपघाताला आळा बसणार आहे. - हेमंत कुमार बेहेरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे.