कोर्टात हजर न राहिल्याने पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 19:04 IST2021-03-05T19:03:39+5:302021-03-05T19:04:52+5:30
गुंड रोशन लोखंडे प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत

कोर्टात हजर न राहिल्याने पोलीस उपनिरीक्षक तडकाफडकी निलंबित
पुणे : पुणे शहर पोलिसांनी गुंड, गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोहिम उघडलेली असून अनेक गुंडांना जेरबंद केले आहे. अशात अटक केलेल्या आरोपींना न्यायालयापुढे हजर करुन त्यांची पोलीस कोठडी घेऊन तपास करण्याचे काम सध्या सुरु आहे. अशावेळी कोर्टात हजर न राहिल्याने व त्यामुळे पोलिसांची बाजू व्यवस्थित मांडली न गेल्याने आरोपींना पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. या कसुरीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकांला तडकाफडकी निलंबित केले.
गुंड रोशन लोखंडे व त्याच्या साथीदारांनी सिंहगड रोड येथे दुकानदारांना धमकावून भर रस्त्यात नाच करुन लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रकार नुकताच घडला होता. या प्रकाराची माहिती असतानाही आरोपींना पकडण्याचा अथवा त्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना न कळविल्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांनी नुकतेच निलंबित केले होते. असे असतानाही याच गुन्ह्यातील आरोपीचा तपास उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. यातील आरोपींना ३ मार्च रोजी न्यायालयात घेऊन जाऊन गुन्ह्यातील जप्त रोख रक्कम २ हजार २०० रुपये न्यायालयात जमा करावयाचे आहे. तसेच या आरोपींच्या मदतीने फैजल काझी याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची आहे, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून आरोपींची पोलीस कोठडी वाढून घेण्यात यावी, असे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक व निरीक्षकांनी अविनाश शिंदे यांना दिले होते. त्यांनी आपण कोर्टात जात असल्याचे व्हॉटस अॅपवर कळविले होते. मात्र, शिंदे हे न्यायालयात हजर राहिले नाहीत. स्वत:ची जबाबदारी त्यांनी सहायक फौजदारांवर टाकली.
परिणामी, न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. त्याच दिवशी सायंकाळी वरिष्ठ अधिकार्यांनी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्यामुळे कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने अविनाश शिंदे यांना अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी निलंबित केले आहे.