दमदार पाऊस

By Admin | Updated: June 25, 2015 03:25 IST2015-06-25T03:25:02+5:302015-06-25T03:25:02+5:30

कऱ्हा नदी खळाळली, इंद्रायणीला पूर, गुंजवणी दुथडी, मुळशीत वीजपुरवठा खंडित, वेल्ह्यात जनजीवन विस्कळीत

Strong rain | दमदार पाऊस

दमदार पाऊस

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून जुन्नर, खेड, आंबेगाव, तसेच पुरंदर, वेल्हा व भोर, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. इंद्रायणी, नीरा, गुंजवणी या नद्यांना पूर आले आहेत. जोरदार पावसामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुरंदरमधील ओढे, नाले खळाळू लागले आहेत. दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. आंबेगाव तालुक्यात बटाट्याच्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.

मार्गासनी : वेल्ह्यात वादळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले असुन भात खाचरांना नदीचे स्वरुप झाले आहे. लावलेली भातरोपे वाहुन गेली असुन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विविध ठिकाणी शेतीचे बांध फुटलेले असुन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर वादळाने मांगदरी येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली आहे.
अंगणवाडीच्या इमारतीचे पत्रे उडाले असुन इमारतीत पाणी साठले आहे. तर येथील शेतकरी सागर तानाजी मांगडे यांचा जनावरांचा गोठा पडला असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंजाई आसनी येथील जयवंत किसन माने, भाऊ महादु माने, तर कोळवडी येथील निवृत्ती कृष्णा चोरघे यांच्या घरांची पडझड झाली असुन या झालेल्या घराच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे व्हावेत, अशी मागणी येथील नागरीक करीत आहेत.
दरम्यान मुळशी, मावळ व खेड तालुक्यात गेले दोन दिवसांत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुळशी तालुक्यातील ८ गावे अंधारात आहेत. इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहत असून पुंडलिकाचे मंदिर पाण्यात होते.

Web Title: Strong rain