परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 15:59 IST2025-04-16T15:58:50+5:302025-04-16T15:59:28+5:30
दोन ते तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालक-मालक आर्थिकदृष्ट्या मालामाल होत आहेत

परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा
पुणे : स्पर्धा परीक्षांच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासचालक भडकावून आंदोलन करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाची परवानगी न घेता क्लास चालवणारे व विद्यार्थ्यांना भडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी संपूर्ण राज्यभरातून पुण्यात विद्यार्थी येतात. प्रामुख्याने सदाशिव आणि नवी पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासिका, खानावळी, पुस्तकांची दुकाने आणि क्लासेस आहेत. त्यामुळे या परिसरात हजारो विद्यार्थी येतात. अनेक स्थानिकांनी राहत्या घरात आणि इमारतींमध्ये कोचिंग क्लासेस अभ्यासिका आणि हॉस्टेल्स सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वी नवी पेठेतील एका इमारतीत सुरू असलेल्या अभ्यासिकेमध्ये आग लागली होती. या आगीत येथील पुस्तके, वह्या आणि फर्निचरचे नुकसान झाले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, त्यानंतर अनधिकृत व बेकायदेशीर अभ्यासिका व कोचिंग क्लासेसचा मुद्दा ऐरणीवर आला होता.
त्यानंतर आता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बहुतांश क्लासचालक विद्यार्थ्यांना भडकवून त्यांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्यासाठी आणि एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाविरोधात आंदोलन करण्याची फूस लावत आहेत. त्यामुळे विद्यार्थी वारंवार आंदोलन करून नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरत आहेत. दोन ते तीन महिने परीक्षा लांबणीवर पडल्यास खासगी क्लासचालक-मालक आर्थिकदृष्ट्या मालामाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस व महापालिका प्रशासनाकडून अभ्यासिका व कोचिंग क्लासेसच्या विविध परवान्यांची तपासणी करणार आहेत. तसेच यामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लासचालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अग्निशमन दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी न घेतात अनेक अभ्यासिका व क्लासेस सुरू करण्यात आले आहे. अशा अभ्यासिका व क्लासेसची तपासणी करून नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर