पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक! स्वतःला शिस्तबद्ध म्हणणाऱ्या अन् गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:58 IST2026-02-16T12:57:53+5:302026-02-16T12:58:33+5:30
राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले

पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दगडफेक! स्वतःला शिस्तबद्ध म्हणणाऱ्या अन् गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का?
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याच्या विधानाचे तीव्र पडसाद रविवारी पुण्यात उमटले. या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून, काँग्रेस भवनासमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाली. परिस्थिती चिघळताच दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली. या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जखमी झाले असून, काही पत्रकार आणि पोलिसांनाही दगड लागले आहेत. स्वतःला शिस्तबद्ध पक्ष म्हणणाऱ्या आणि महात्मा गांधीजींच्या मार्गाने चालणाऱ्या पक्षांची हीच शिकवण का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
रविवारी (दि. १५) सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर सपकाळ यांच्या विधानाविरोधात सुमारे दीड तास आंदोलन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पक्षांकडून घोषणाबाजी सुरू असतानाच अचानक दगडफेक झाली. यात एका महिला व एका पुरुष कार्यकर्त्याच्या डोक्याला मार लागून रक्तस्राव झाला. दोन्ही पक्षांच्या लोकांकडून दगडफेक सुरू झाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. यात काही वाहनांचे देखील नुकसान झाले. राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत आहे. पोलिसांसमोरही काल कार्यकर्त्यांनी धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले. या घटनेत रस्त्यावरील एखाद्या सामान्य माणसाला दगड लागला तर त्याने कोणाकडे न्याय मागायचा असा सवालही उपस्थित होऊ लागला आहे. आंदोलन, चळवळ ही शांततेच्या मार्गाने व्हायला हवी. हिंसेच्या मार्गाने होत असल्यास त्याला आंदोलन म्हणता येत नाही.
दरम्यान, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करून गर्दी पांगवली. भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या पाठिंब्याने हल्ला केल्याचा आरोप करत काँग्रेसने फरासखाना पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी उपस्थित काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महापौर मंजूषा नागपुरे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध पर्वती पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे (५१, रा. साने गुरुजीनगर, आंबील ओढा काॅलनी, सदाशिव पेठ) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन्ही पक्षांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे...
दगडफेकीच्या घटनेनंतर काँग्रेसकडून फरासखाना पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत, भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी भाजपकडून देखील दगडफेकीचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात परस्पर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.