स्पर्म व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; २ कोटींची २ किलो उलटी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:14 IST2025-08-25T13:13:38+5:302025-08-25T13:14:15+5:30
स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागड्या परफ्यूममध्ये केला जातो

स्पर्म व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; २ कोटींची २ किलो उलटी जप्त
पुणे : बेकादेशीररीत्या स्पर्म व्हेल माशाच्या उलटीची तस्करी प्रकरणात पुणे वन विभागाने तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यावेळी दोन कोटी रुपयांची व्हेल माशाची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली.
गुरुवारी (दि.२१) वन विभागाला व्हेल माशाची तस्करी करणारे आरोपी हे कोथरूड परिसरातील चांदणी चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, विभागीय वन अधिकारी अमोल थोरा यांंच्या मार्गदर्शनाखाली पुणे वन विभागाचे वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश चव्हाण यांच्या पथकाने चांदणी चौकात चार संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून व्हेल माशाची दोन किलो उलटी जप्त करण्यात आली. इनोव्हा कारमधून ही उलटी जप्त करण्यात आली. याच कारवाईदरम्यान एक आरोपी फरार झाला. या प्रकरणात स्पर्म व्हेल माशाची उलटी बाळगल्याप्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्पर्म व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग प्रामुख्याने महागड्या परफ्यूममध्ये केला जातो. जास्त काळ टिकणारा सुगंध तयार करण्यासाठी याचा वापर होतो.