भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 20:53 IST2021-07-14T20:53:03+5:302021-07-14T20:53:54+5:30
चिंचोशी हद्दीत समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली.

भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; खेड तालुक्यातील घटना
शेलपिंपळगाव : मोहितेवाडी - केंदुर रस्त्यावर चिंचोशी (ता.खेड) गावच्या हद्दीत भरधाव डंपरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा डंपरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून अपघाताला जबाबदार असणाऱ्या अवैध वाहतुकीविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी (दि.१४) सकाळी आठच्या सुमारास घडला. अंकीत नंदकुमार सांगडे (वय २५ रा.चिंचोशी ता.खेड) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंकित दुचाकीने (एमएच १४ यु ५१७४) कामावरून घरी परत येत होता. मात्र चिंचोशी हद्दीत समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने (एमएच १४ डीएम ३४११) दुचाकीला धडक दिली. यामध्ये अंकित थेट डंपरच्या चाकाखाली सापडल्याने जागीच ठार झाला. त्याच्यापाठीमागे आई - वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी चाकण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या रस्त्यावरून अवैधरित्या मुरुम उपसा करणारे असंख्य डंपर नियम धाब्यावर बसवून भरधाव वेगाने ये-जा करत आहेत. या वाहनांमुळे रस्त्यावरील इतर वाहतुकीला धोका निर्माण झाला असून अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.